Mon, Jul 06, 2020 23:17होमपेज › Aurangabad › दंगलीच्या गुन्ह्यांचा तपास ‘एसआयटी’कडे

दंगलीच्या गुन्ह्यांचा तपास ‘एसआयटी’कडे

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जुन्या औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरून पेटलेल्या दंगल प्रकरणात क्रांती चौक, सिटी चौक आणि जिन्सी ठाण्यात अडीच ते तीन हजार समाजकंटकांविरुद्ध वेगवेगळे सात गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सोमवारी (दि. 14) पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी 50 अधिकारी कर्मचार्‍यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. दंगेखोरांविरुद्ध जास्तीत-जास्त पुरावे गोळा करून कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 

गांधीनगर आणि मोतीकारंजा भागात दोन गटांत झालेल्या वादानंतर शुक्रवारी (दि. 11) शहागंज, राजाबाजार, नवाबपुरा चौक आणि जिन्सी भागात दंगल पेटली. रात्री 12 वाजता सुरू झालेली जाळपोळ, दगडफेक पहाटेपर्यंत सुरूच होती. यात जवळपास 70 दुकाने जाळण्यात आली. तर 50 पेक्षा जास्त वाहने पेटवून देण्यात आली. हा सर्व प्रकार वाढत असल्याचे लक्षात आल्यावर सकाळी बंदोबस्त वाढवून पोलिसांनी दंगेखोरांवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत जमावाने शहागंज येथे 72 वर्षीय वृद्ध जगनलाल बन्सिले यांना घरात शिरून जिवंत जाळले होते. यावेळी उद्भवलेली परिस्थिती हाताळताना पोलिसांना प्लास्टिक बुलेटने फायरिंग करावी लागली. यात गोळी लागून 17 वर्षीय महंमद अब्दुल हरुण कादरी याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शनिवारी शहरात दाखल झालेले अतिरिक्‍त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

उपायुक्‍तांनी घेतली बैठक

विशेष तपास पथकामध्ये सहायक पोलिस आयुक्‍त सी. डी. शेवगण, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, श्रीकांत नवले, सुरेश वानखेडे, सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, शेख अकमल, अजबसिंग जारवाल, राहुल खटावकर, विजय घेरडे, अर्चना पाटील, विलास ठाकरे, उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, हेमंत तोडकर, अमरनाथ नागरे, दादाराव कोपनर, राहुल चव्हाण, योगेश धोंडे, सतीश पंडित, राहुल भदरगे, क्रांती निर्मळ, आश्‍लेषा पाटील, सहायक फौजदार सुभाष खंडागळे, कर्मचारी गोकुळ वाघ, सुनील फेपाळे, महेश उगले, अभिजित गायकवाड, सचिन शिंदे, दत्ता गढेकर, वीरेश बने, शेख नवाब, प्रभाकर राऊत, एल. डी. कीर्तीशाही, सुनील धुळे, देविदास खेडकर तसेच शहर सहायक पोलिस आयुक्‍त कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सोमवारी उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सर्वांची सिटी चौक ठाण्यात बैठक घेऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

काय करणार एसआयटी?

विशेष तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी हे दंगलग्रस्त भागातील विविध सीसीटीव्हीचे फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. याशिवाय पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासून दंगेखोरांची ओळख पटविण्यात येणार आहे. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या फोटोवरूनही दंगेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येईल. जास्तीत-जास्त तांत्रिक पुरावे गोळा करून दोषींविरुद्ध अतिशय कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी पथकाला दिल्या आहेत.