Fri, Jul 10, 2020 01:40होमपेज › Aurangabad › गोंदीच्या फौजदारावर लुटीचा आरोप : गोंधळानंतर जप्तीचा देखावा

आरोपीऐवजी ‘उचलले’साडेअकरा लाख रुपये

Published On: Jun 12 2018 11:18AM | Last Updated: Jun 12 2018 11:18AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आरोपीच्या शोधार्थ औरंगाबादेत आलेल्या गोंदी (ता. अंबड, जि. जालना) पोलिसांनी आरोपीऐवजी त्याच्या चुलत्याच्या घरातून अनधिकृतरीत्या तब्बल सव्वाअकरा लाख रुपये ‘उचलल्या’चा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री सातारा परिसरात घडला. कोणतेही सर्च वॉरंट नसताना अन् ‘त्या’ रकमेचा गुन्ह्याशी संबंध नसताना केलेली ही ‘उचलेगिरी’ गोंदी पोलिस पथकासाठी चांगलीच अडचणीची ठरली. आरोपीच्या चुलत्याने या पथकाविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात थेट सव्वाअकरा लाख रुपये लुटल्याची तक्रार दाखल केली आहे. 

‘उचलेगिरी’ अंगलट येत असल्याचे पाहून गोंदी पोलिसांनी अखेर सोमवारी दुपारी ‘ती’ रक्कम जप्त करीत असल्याचे दाखवीत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी  सुरू करण्यात आली आहे. त्याचे झाले असे की, गोंदी येथे 2 जून रोजी वाळूवरून दोन गटांत वाद झाला होता. सुयोग सोळुंके, विजय सोळुंके, रघुनंदन मार्गे आणि अमोल मार्गे यांनी राहुल राक्षे (रा. पुरण, ता. अंबड) यांना मारहाण केली होती. त्यानुसार, राक्षे यांच्या फिर्यादीवरून गोंदी ठाण्यात प्राणघातक हल्ला केला म्हणून चौघांविरुद्ध कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

175/2018 असा गुन्हा रजिस्टर नंबर आहे. त्याचा तपास उपनिरीक्षक अमन शिरसाट करीत आहेत. दरम्यान, ते 10 जूनला रात्री 12 वाजता फौजदार शिरसाट हे सहायक फौजदार सय्यद यांच्यासह फिर्यादी राक्षे व अन्य दोन ते तीन जणांना घेऊन दोन खासगी वाहनातून औरंगाबादेत आले. बीड बायपासवरील नंदिनी हॉटेलच्या पाठीमागे यशवंत स्वामी समर्थ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. 1 मध्ये गेले. हा फ्लॅट आरोपींचे चुलते सचिन सोळुंके यांचा आहे. वॉरंट नसतानाही घेतली घरझडती नियमानुसार घरझडती घेण्यासाठी पोलिसांना ‘सर्च वॉरंट’ सोबत आणावे लागते. गोंदी पोलिसांनी कोणतेही वॉरंट सोबत आणलेले नव्हते. असे असतानाही त्यांनी सचिन सोळुंके यांच्या घरावर छापा मारला. घरात आरोपी सापडले नाहीत. 

तेव्हा या पथकाने चक्क अनधिकृतरीत्या घरझडती घेतली. झडतीत पोलिसांनी घरात तब्बल सव्वाअकरा लाख रुपये रोख रक्कम सापडली. ही रक्कम पोलिसांनी उचलली आणि घरातून काढता पाय घेतला. सचिन सोळुंके यांनी पोलिसांना पैसे नेण्यापासून रोखले. तेव्हा पोलिसांनी आपल्याला दमदाटी केल्याच आरोप त्यांनी ‘पुढारी’शी बोलताना केला. तक्रारदाराने पुरवला पिच्छा! आपले पोलिसांनी अनधिकृतरीत्या सव्वाअकरा लाख रुपये ‘उचलल्या’चे लक्षात आल्यानंतर सोळुंके यांनी या पथकाचा पाठलाग सुरू केला.

घरमालक आपला पाठलाग करीत असल्याचे पाहून आता आपण अडचणीत येऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर हे पथक सातारा पोलिस ठाण्यात दाखल झाले; परंतु ती हद्द आमची नाही, असे सातारा पोलिसांनी सांगितले. मग पोलिस जवाहरनगर ठाण्यात आले. या ठाण्यात काही वेळ हे पथक थांबले. घरमालक तेथेही या पथकाच्या मागावरच होते. माझे पैसे तुम्ही कसे उचलले, असा जाब ते विचारत होते. या गोंधळात पहाटेचे चार वाजले. शेवटी घरमालकाने ‘मी तुमच्याविरुद्ध पैसे चोरल्याची फिर्याद देणार’ असे म्हणत थेट पुंडलिकनगर ठाणे गाठले.

पुंडलिकनगर ठाण्यात दिली चोरीची तक्रार पहाटे घरमालक सोळुंके यांनी पुंडलिकनगर ठाणे गाठले. आता आपण अडचणीत येणार, हे लक्षात आल्यानंतर पोलिस पथकही त्यांच्यापाठोपाठ  पुंडलिकनगरला दाखल झाले. वाटेत पोलिसांनी आपल्याला रक्कम परत घ्या, जाऊ द्या, अशी विनंती केली होती, असे सोळुंकेयांचे म्हणणे आहे. ठाण्यात आल्यानंतर सोळुंके यांनी गोंदी पोलिसांविरुद्ध पैसे लुटीची लेखी तक्रार दिली व गुन्हा नोंदविण्यासाठी ठाण मांडले.

रविवारी रात्री सुरू झालेला हा ‘उचलेगिरी’चा गोंधळ पुंडलिकनगर ठाण्यात दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होता. सोळुंके यांचा पैसे घेण्यास नकार पुंडलिकनगरचे निरीक्षक शिनगारे यांनी सचिन सोळुंके आणि फौजदार शिरसाट यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेतली. त्यावर शिरसाट हे पैसे परत करण्यास तयार झाले. मात्र, सोळुंके यांनी पैसे घेण्यास नकार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिरसाट यांनी अनियमितता केली, असा आरोप त्यांनी केला.