Sat, Jul 04, 2020 02:47होमपेज › Aurangabad › हिंगोली इच्छुकांची वाढली घालमेल

हिंगोली इच्छुकांची वाढली घालमेल

Published On: Sep 28 2019 1:20AM | Last Updated: Sep 28 2019 1:20AM
हिंगोली : गजानन लोंढे

युती झाल्यास वसमत व कळमनुरी विधानसभा मतदार संघात बंडखोरीचा धोका असणार असून, भाजपकडून इच्छुक असलेल्या अनेकांनी युती होऊ नये यासाठी देव पाण्यात ठेवल्याचे बोलले जात आहे. युती झाली तरी वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडवून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. 

मागील काही दिवसांपासून भाजप व शिवसेनेमध्ये येणार्‍यांचा ओघ वाढला आहे. शिवसेना व भाजपमध्ये सर्वाधिक इच्छुक आहेत. कळमनुरी व वसमत या सेनेच्या मतदार संघात अनेक दिग्गजांनी तयारी सुरू केली असून, या दोन्ही जागा शिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी भाजपच्या रणनीतीत मोठे बदल झाल्याचे बोलले जात आहे. साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून दोन्ही मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकविण्याचे मनसुबे भाजप नेतृत्वाचे राहिले आहे. कळमनुरी विधानसभा मतदार संघातून माजी आ. गजानन घुगे, माजी. खा. शिवाजी माने यांच्यासह इच्छुकांची भली मोठी रांग आहे.

त्यानंतर शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी जिल्हाप्रमुख संतोष बांगरसह इतर काहींची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाकडून विनायकराव भिसे यांनीही दावा सांगितल्यामुळे कळमनुरी विधानसभा मतदार संघात बंडखोरीचा धोका वाढला आहे. युती झाल्यास नेमकी जागा शिवसेनेकडे राहते की भाजपच्या वाट्याला जाते, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू असून, माजी आ. गजानन घुगे यांनी मतदार संघात जोरदार फिल्डिंग लावल्याने ऐनवेळी ही जागा भाजपला सोडली जाईल, असा दावाही अनेकांकडून केला जात आहे. यातूनच बंडखोरीची भीती व्यक्त केली जात आहे. दोन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींकडून बंडखोरी रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, यावर येथील युतीच्या उमेदवाराचे भवितव्य राहणार आहे.

वसमत विधानसभा मतदार संघातून भाजपचे अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी तयारी केली असली, तरी हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या वाट्याला असून, विद्यमान आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा पुन्हा तयारी करीत आहेत, परंतु लोकसभा निवडणुकीत आ. मुंदडा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने ते ऐनवेळी अपक्ष लढतील, अशी चर्चाही होत आहे. गत विधानसभा निवडणुकीत थोड्या फरकाने पराभूत झालेले शिवाजी जाधव हे भाजपकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी मैदानात राहणार असल्याने दोघांपैकी एकाची अडचण झाली आहे.

शिवसेनेतून विद्यमान आ. मुंदडा यांना विरोध वाढत असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पाच ते सहा जणांनी मुंबई येथे पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने मुंदडा यांना अडचण झाली आहे. युती झाल्यास मुंदडा यांची बंडखोरी निश्चित मानली जात आहे. एकंदरीत आजच्या घडीला युतीची घोषणा झाल्यास कळमनुरी व वसमत विधानसभा मतदार संघातून बंडखोरी होणार, या चर्चेला ऊत आला आहे. तर दुसरीकडे आघाडीतील इच्छुकांनी सावध भूमिका घेत जुन्या व नव्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन तयारी सुरू केली आहे.

कळमनुरीतून विद्यमान आ. डॉ. संतोष टारफे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे त्यांनी गावनिहाय नियोजन सुरू केले आहे. हिंगोलीतून भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे यांना टक्कर देण्यासाठी पुन्हा एकदा माजी आ. भाऊराव पाटील-गोरेगावकर यांनाच काँग्रेसकडून मैदानात उतरविण्याची तयारी केली जात आहे. वसमतमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर किंवा माजी सभापती राजू नवघरे यांना उमेदवारी दिली जाईल. एकंदरीत युती झाल्यास बंडखोरीचा धोका असला तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचे खचलेले मनोबल वाढविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर राहणार आहे.