Mon, Dec 16, 2019 11:11होमपेज › Aurangabad › व्यसनासाठी ‘त्याने’ फोडले स्वतःचेच घर 

व्यसनासाठी ‘त्याने’ फोडले स्वतःचेच घर 

Published On: Nov 14 2018 8:16PM | Last Updated: Nov 14 2018 8:16PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दारू, सिगारेटसारख्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलाने मित्रांचे उसने पैसे परत करण्यासाठी स्वतःचेच घर फोडून ११ तोळे सोने लंपास केले. कुटुंबिय नातेवाईकाच्या अंत्यविधीत गेले असताना त्याने ६ नोव्हेंबर रोजी कपाटाचे लॉक तोडून (चावी असूनही घरफोडी झाल्याचे भासविण्यासाठी) चोरी केली होती. घटनास्थळ पाहणीनंतर संशयावरून अल्पवयीन मुलावर पाळत ठेवून सिडको पोलिसांनी बुधवारी (दि. 14) त्याचे बिंग फोडले. त्याच्याकडून अकरा तोळे सोने जप्त केले असून, त्याला २१ नोव्हेंबर पर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

सिडको ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले की, साईनगर, एन-6, सिडको येथे एक मध्यमवर्गीय कुटुंब राहते. ६ नोव्हेंबर रोजी जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे घरातील सर्वजण अंत्यविधीला गेले होते. तिकडे बराच वेळ लागल्यामुळे दोन्ही मुले दुपारनंतर घरी आले. हीच संधी साधून बारावीत शिक्षण घेणार्‍या मोठ्या मुलाने हातोडीने कपाटाचे लॉक तोडले आणि ११ तोळे सोन्याचे दागिने चोरले. विशेष म्हणजे, त्यानंतर त्यानेच आई-वडिलांना फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली. दरम्यान, चोरीची माहिती सिडको पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी करीत गुन्हा नोंद करून घेत तपासाची चक्रे फिरविली. 

सर्व लॉक चावीने उघडल्यामुळे अडकला
अल्पवयीन मुलाने नेहमीप्रमाणे चावीने चॅनलगेट, दरवाजाचे कुलूप उघडले. त्यानंतर चावी असूनही हातोडीने कपाटाचे लॉक तोडले आणि पुन्हा चावीने आतील कप्पे उघडून डल्ला मारला होता. घटनास्थळही पाहणी करताना नेमका हाच प्रकार पोलिसांना खटकला. चोरट्याला कपाटातील कप्प्यांच्या लॉकच्या बनावट चाव्या कशा उपलब्ध झाल्या? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, डीबी पथकाचे उपनिरीक्षक बी.के. पाचोळे यांनी घरातील दोन्ही मुलांवर पाळत ठेवली.

खात्री पटताच घेतले ताब्यात
ज्यांच्या घरी चोरी झाली होती त्यांचा मोठा मुलगा बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेतो. त्याच्या व्यसनाबाबत आई-वडिलांना फारशी माहिती नव्हती. तो दारू आणि सिगारेटच्या प्रचंड आहारी गेल्याचे पोलिसांना समजले. तसेच, व्यसनासाठी त्याने अनेक मित्रांकडून जवळपास २५ हजार रुपये हातउसने म्हणून घेतले होते. त्या मित्रांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. चोरी झाल्यानंतर पोलिस संशयाने पाहात असल्यामुळे तो तीन दिवस गावीही गेला. या सर्वच बाजू त्याच्या विरोधात गेल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी करण्याचे ठरविले. तो चौकशीला यायलाही टाळाटाळ करू लागला. त्याने जवळपास तीन तास पोलिसांना फिरविले. अखेर पोलिसांनी विश्‍वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने साई मैदानाच्या भिंतीजवळ असलेल्या सिमेंट पाईपमध्ये ठेवलेले ११ तोळे दानिगे काढून देत चोरीची कबुली दिली.