Thu, Sep 24, 2020 09:30होमपेज › Aurangabad › महाविकास आघाडीसाठी सुरवातीला मीच पुढाकार घेतला : दलवाई

महाविकास आघाडीसाठी सुरवातीला मीच पुढाकार घेतला : दलवाई

Last Updated: Jan 22 2020 8:35PM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

मुस्लिमांच्या मागणीमुळे आम्ही शिवसेनेसोबत आघाडी केली, असे अशोक चव्हाण का म्हणाले, हे मला माहित नाही. महाविकास आघाडीसाठी मीच सुरवातीपासून पुढाकार घेतला, पक्षप्रमुख सोनिया गांधी यांच्यासह केंद्रातील काँग्रेस नेत्यांच्या शंका दूर केल्या, अशी माहिती खासदार हुसैन दलवाई यांनी बुधवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

दलवाई म्हणाले की, शिवसेनेसोबत गेल्यास त्याचे काय परिणाम होतील, मुस्लिमसमाज कशारीतीने याकडे पाहील. याबाबत सोनिया गांधी यांच्या शंका दूर केल्या. मीच पुढाकार घेवून, मुस्लिम समाजाचे म्हणणे ऐकले. मला महाराष्ट्रातील असंख्य मुस्लिमांसह उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, ओरिसा, हैदराबाद, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी ठिकाणांहून फोन आले. त्यानंतर मी सोनिया गांधींना एक पत्र लिहिले होते. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच मी शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबतचे भाष्य केले होते, असे त्यांनी सांगितले. 

भाजप १०५ जागा घेवून थांबले होते, तेव्हा युतीचे सरकार येईल, असे सांगितले जात होते. तेव्ही मीच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे येणार, असे म्हणालो होतो. केंद्रातील नेत्यांना समजावण्यासाठी पत्र लिहून शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्व वादातील फरक त्यांच्या लक्षात आणून दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आरएसएसवर अनेकदा टिका केली आहे. शिवसेनेने नेहमीच काँग्रेसला मदत केलेली आहे, असेही दलवाई यांनी स्पष्ट केले. 

दलवाई म्हणाले की, आणिबाणीचे समर्थन करत, बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पूर्ण पाठिंबा दिला होता. अंतुलेंच्या नेतृत्वातील सरकारलाही पाठिंबा दिला होता. प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांच्या निवडणुकीवेळीही पाठिंबा दिला होता. माझ्या पत्राचा फार मोठा परिणाम झाला. मुसलमानांनी सांगितल्याने आम्ही शिवसेनेबरोबर गेलो, असे अशोक चव्हाण यांचे म्हणणे तितकेसे बरोबर नाही, असेही खा. दलवाई यांनी स्पष्ट केले. हे सरकार पाच वर्षे चालेल, आणि आघाडी २५ वर्षे टिकेल, असे त्यांनी सांगितले.

 "