Mon, Jul 13, 2020 08:17होमपेज › Aurangabad › 'मी कुस्तीच्या आखाड्यात उतरलोय'

'मी कुस्तीच्या आखाड्यात उतरलोय'

Published On: Mar 31 2019 5:53PM | Last Updated: Mar 31 2019 5:20PM
औरंगाबाद :  प्रतिनिधी

कुणी बंडखोरी केली, माझ्याविरोधात कोण-कोण आहेत, अशा गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. माझे लक्ष अर्जुनासारखे आहे. मला फक्‍त पोपटाचा डोळा दिसतो. मी कुस्तीच्या आखाड्यात उतरलेलो असून, माझ्याविरोधात कितीही पहेलवान आले तरी माझे लक्ष हे जिंकण्यावर आहे. कोणता पहेलवान मजबूत आहे, कोणता कमजोर आहे, या आव्हानपेक्षा सर्व पहेलवानांना चित करून कुस्ती जिंकण्याचेच माझे लक्ष्य आहे., असे महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांनी रविवारी (ता.३१) पत्रकार परिषदेत सांगितले.

मला पक्षाने तिकिट दिलेले आहे. पक्षाच्या पाठिशी उभे रहायचे की, बंडखोरी करायची हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पक्षाने आपल्याला काय दिले, याचा विचार केला तर ते नक्कीच माझ्या पाठिशी उभे राहतील. असे सत्तार यांचे नाव न घेता झांबड म्हणाले. माझ्या पाठिशी जनता उभी असून प्रत्येक माणूस माझ्या कामाला लागला आहे. त्यामुळे पक्षातील नाराजी मला कुठेही दिसत नाही. ही निवडणूक जिंकण्यासाठी आहे, कुणाला दाखवण्यासाठी नाही. 

यावेळी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, शहराध्यक्ष नामदेव पवार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, प्रकाश मुगदिया, अशोक सायन्ना, अ‍ॅड. सय्यद अक्रम,इब्राहिम पठाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, रंगनाथ काळे, काशिनाथ कोकाटे, सुधाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती.

उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे, मी उमेदवाराचा  अर्ज  भरायला चाललो आहे. ३१ रोजी रात्री येणार असून, १ तारखेला तुमच्याबरोबर हजर आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व  दौर्‍यात माझ्या सर्व ताकदीनिशी तुमच्यासोबत आहे, असा खुलासा आमदार सतीश चव्हाण यांच्या अनुपस्थितीवर झांबड यांनी केला. विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्‍त बैठकीलाही सतीश चव्हाण गैरहजर राहिले होते. 

जलील यांची उमेदवारी ही खैरेंची सेटलमेंट

आमचा पक्ष राज्यात कुठेही लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार नाही. एमआयएमच्या हैदराबादेतील नेत्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर अचानकच आमदार इम्तियाज जलील यांनी उमेदवारी घेतली. यामागे सेटलमेंटच आहे. मुस्लिम समाजातील सर्वांनाच माहिती आहे,  ही उमेदवारी कशी आली ते. उमेदवारी नाही दिली तर मी अपक्ष लढणार, अशी धमकी जलील यांनी त्यांच्या पक्षप्रमुखांना दिल्यानेच पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, असा गौप्यस्फोटही झांबड यांनी यावेळी केला.