Wed, Jul 08, 2020 03:51होमपेज › Aurangabad › औरंगाबाद: राज्यात उष्माघाताचा पहिला बळी...

औरंगाबाद: राज्यात उष्माघाताचा पहिला बळी...

Published On: Mar 27 2019 6:06PM | Last Updated: Mar 27 2019 6:06PM
विहामांडवा (औरंगाबाद): प्रतिनिधी 

आठवडी बाजारात आलेल्या वृद्ध महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना विहामांडवा ता.पैठण येथे मंगळवारी (ता.२६)घडली आहे. राज्यात यंदा उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला आहे. .तापमान ४० अंशापर्यंत जावून पोहोचल्याने लहानांपासून वृध्दापर्यंत सर्वजण हैराण होत आहेत. बिजानबी नवाब शेख वय (वय ८०), (रा.टाकळी अंबड,  ता.पैठण )असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या वृध्द  महिलेचे नाव आहे.

बिजानबी शेख या मंगळवारी (ता.२६) भरणाऱ्या विहामांडवा ता.पैठण येथील आठवडी बाजारात आल्या होत्या. प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्‍या. उपस्थित  वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांच्यावर उपचार करुन गोळ्या औषधे दिले. भर दुपारच्या उन्हात दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर चालत गेल्या. बळीराम व्होटकर यांच्या खळ्यात अचानक चक्कर येऊन त्या जमिनीवर कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, संध्याकाळी शेख या नागरिकांना मृतावस्थेत आढळल्या. त्यानंतर याबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्यांनी बिजानबी शेख यांच्या कंबरेला असणाऱ्या पैशाच्या पिशवीत शंभर रुपयांची नोट आणि गोळ्यांचे पाकीट सापडले. त्यांतर  मुलीचा चिठ्ठीत लिहीलेला मोबाईल नंबर सापडला. त्यावर संपर्क साधल्यानंतर बिजानबी शेख यांची ओळख पटली.

पोलिसांनी त्यानंतर शेख यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे  सांगितले. बुधवारी सकाळी त्यांच्यावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर आलेल्या अहवालात उष्माघात व उपासमारीने त्यांचा मृत्यू  झाल्याचे सांगण्‍यात आले.