Tue, Jul 07, 2020 19:04होमपेज › Aurangabad › आरोग्य उपसंचालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा : खच्चीकरण केल्याचा आरोप

कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्रात अधिकारी महिलेचा छळ

Published On: Mar 01 2019 2:18PM | Last Updated: Mar 01 2019 2:49PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

केवळ मागासवर्गीय असल्यामुळे कार्यालयात माझे खच्चीकरण सुरू आहे. माझा मानसिक व आर्थिक छळ केला जात असल्याची तक्रार साथरोग शास्त्रज्ञ (वर्ग-1) महिलेने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. 28) रात्री आरोग्य उपसंचालकांसह तिघांविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य व कुटुंंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. गोविंद चौधरी आणि त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी आर. एम. मोहिते अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची नावे आहेत. 

या प्रकरणी आरोग्य व कुटुंंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातील साथरोग शास्त्रज्ञ (वर्ग-1) डॉ. रेखा गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्या जून 2016 पासून या पदावर कार्यरत आहेत. मागासवर्गीय असल्यामुळे मी रुजू झाल्यापासून डॉ. चौधरी हे मानसिक व आर्थिक छळ करीत आहेत. तसेच, कार्यालयातील मागासवर्गीय इतर कर्मचार्‍यांनाही त्यांचा असाच त्रास सुरू असतो. सुरुवातीला त्यांनी मला नियोजित केबिनमध्ये बसू दिले नाही. तसेच, वर्ग-1 पदासाठी असलेल्या सोयी-सुविधा मागणी करूनही दिल्या नाहीत. एक महिन्याने स्वतःहून केबिनमध्ये बसल्यावर माझ्या दिशेने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा मॉनिटर चौधरी यांनी स्वतःसमोर ठेवला. त्यामुळे माझ्या वैयक्‍तिक स्वातंत्र्यावर बाधा आली. ते केबिनमध्ये बोलावून नाहक छळ करायचे. जातीवरून बोलायचे. 

याबाबत आरोग्य उपसंचालकांकडे तक्रारी केल्या. त्यावरून चौकशी समिती नेमण्यात आली. डॉ. व्ही. एस. भटकर हे चौकशी अधिकारी होते. त्यांच्याकडे चौकशीसाठी उपस्थित राहिल्यावर त्यांनी अचानक चौकशी पुढे ढकलल्याचे सांगून डॉ. लाळे यांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर लाळे यांना भेटून चौकशी करण्याची विनंती केली. त्यांनीही माझ्यावर दबाव आणू नका, असे म्हणून टाळाटाळ केली.

सिनेमातील उदाहरण देऊन छळले

उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांच्याकडे गेल्यावर त्यांनी राजेश खन्नाच्या सिनेमातील उदाहरण देऊन आम्हालाच उद्धट संबोधले. तसेच, डॉ. गोविंदची चौकशी लावून धरली तर तुमची पुंगी वाजवितो, असा दम दिला. त्याशिवाय हबीब पाशा नावाच्या इसमाची भीती दाखविली, तुमचे पती रिटायर झाल्यावर कशी नोकरी करता, हे पाहू म्हणून धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा) 1989 चे कलम 3 सह भादंवी 509, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंद असून, अधिक तपास एसीपी हनुमंत भापकर करीत आहेत.