Sat, Jul 11, 2020 19:08होमपेज › Aurangabad › पुरलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

पुरलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

Published On: Jun 21 2018 1:28AM | Last Updated: Jun 21 2018 12:57AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कचरा असे नाव जरी काढले तरी शहरातील नागरिकांच्या अंगावर काटे येतात. दहा-बारा दिवस नव्हे तर तब्बल चार महिने शहर कचरा कोंडीत अडकलेले आहे. आजही शहराची परिस्थिती कचर्‍याच्या बाबतीत गंभीरच आहे, परंतु या कालावधीत मनपा प्रशासनाच्या वतीने मिळेल त्या जागेवर कचरा पुरण्याची नामी शक्कल लढविली होती, मात्र पावसाळा सुरू होताच त्याचे दुष्परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील चौकाचौकांत कचर्‍याची दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यातआले आहे. 

नारेगाव येथील कचरा डेपोत कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत शहरातील गल्लोगली कचर्‍याचे ढिगारे उभे राहिले. शहरालगत असलेल्या विविध गावांमध्ये कचरा टाकण्यास प्रचंड विरोध झाला. अनेक ठिकाणी आंदोलने, मारहाण, जाळपोळीच्या घटना घडल्या. राज्यातच नव्हे तर देशात औरंगाबादचे कचर्‍यामुळे नाव बदनाम झाले. या कालावधीत मनपा प्रशासनाच्या वतीने ‘रात्रीस खेळ चाले’ या वृत्तीने शहरातील ओपन स्पेस, सिद्धार्थ उद्यान, हर्सूल येथील जांभूळ वन, मिसारवाडी, ग्रीन बेल्ट सह मिळेल त्या जागेवर कचरा पुरण्यात आला.

तसेच कचर्‍यापासून खतनिर्मितीसाठी विविध पीट उभारण्यात आले, परंतु पावसाला सुरुवात होताच कचरा पुरलेल्या ठिकाणांची परिस्थिती गंभीर झालेली आहे. पावसाचे पाणी थेट कचरा पुरलेल्या ठिकाणी मुरत आहे. यामुळे जवळपासच्या नागरिकांच्या घरातील बोअरचे पाणी दूषित होण्यास सुरुवात झाली. तसेच शहरातील विविध ठिकाणी खतनिर्मितीच्या नावाखाली कचर्‍यांचे पीट उभारण्यात आले. अशा ठिकाणी पावसाचे पाणी पडल्यानंतर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यू, मलेरियांच्या आजारात वाढ होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. 

या ठिकाणची परिस्थिती गंभीर

सिडकोतील राजे संभाजी शाळेच्या पाठीमागची बाजू, रमानगर, सिद्धार्थ गार्डन, रोपळेकर हॉस्पिटल समोरील ओपन स्पेस, सिडकोतील ग्रीन बेल्ट, सातारा परिसरातील विविध कॉलन्या, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात कचर्‍याची दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.