होमपेज › Aurangabad › तूर उत्पादक शेतकर्‍यांंना लवकरच अनुदान...!

तूर उत्पादक शेतकर्‍यांंना लवकरच अनुदान...!

Published On: Aug 11 2018 1:39AM | Last Updated: Aug 11 2018 1:33AMऔरंगाबाद : तुकाराम शिंदे 

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अनुदानाचे वाटप सुरू असतानाच लवकरच सरकार तूर उत्पादक शेतकर्‍यांंच्या बँक खात्यातही प्रतिक्‍विंटल एक हजार रुपयांची रक्‍कम अनुदानापोेटी जमा करणार आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, त्यांना तूर खरेदीसंदर्भात मोबाइलवर एसएमएस आले नाही, अशा शेतकर्‍यांना हे अनुदान दिले जाणार असून त्यात जालना जिल्ह्यातील 770 शेतकर्‍यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी जी. एन. मगर यांनी दिली.   

गेल्या वर्षी जालना जिल्ह्यात तुरीचे भरघोस उत्पादन झाले. मात्र बाजारात तुरीचा दर प्रतिक्‍विंटल चार हजार रुपयांच्या पुढे गेला नाही. त्यामुळे लागवड, उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर शेतकर्‍यांना परवडत नव्हता म्हणून सरकारने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यातील खरेदी विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जालना, तीर्थपुरी, परतूर, आष्टी, मंठा, अंबड, भोकरदन, जाफराबाद या आठ केंद्रांवर 48 हजार क्‍विंटल तूर खरेदी केली होती. जवळपास पाच हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी करून या केंद्रांवर तुरीची विक्री केली होती. या तुरीला प्रतिक्‍विंटल 5 हजार 450 रुपये दर मिळाला. या केंद्रावर विक्री केलेल्या अनेक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सरकारने पैसेही जमा केले आहेत, असेही मगर यांनी सांगितले.

दरम्यान, तूर साठविण्यासाठी गोडाऊन शिल्‍लक नसल्याचे कारण दाखवत सरकारने 15 मे रोजी ही सर्व खरेदी केंद्रे बंद केली. पैशांच्या गरजेपोटी यातील अनेक जणांनी मापासाठी नंबर लागण्याअधीच कमी दरात आपली तूर नाईलाजाने बाजारात विकून टाकली. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली, अशा 770 जणांनी शेवटच्या क्षणापर्यंत तुरीचे माप व्हावे, म्हणून  नंबर लागण्याची प्रतीक्षा केली. केंद्रे बंद केल्यानंतर या 770 शेतकर्‍यांना मापासाठी नंबर लागण्याबाबतचे एसएमएस आले नाही. त्यामुळे या शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, या शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने प्रतिक्‍विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेत त्यांना दिलासा दिला. या केंद्रांवर तूर विक्री करण्यासाठी हेक्टरी 11 क्‍विंटल 30 किलो म्हणजेच दोन हेक्टरला 22 क्‍विंटल 60 किलोची मर्यादा शेतकर्‍यांना घालून देण्यात आली होती. त्यानुसार 770 शेतकर्‍यांना  प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या पुढे अनुदान मिळेल, अशी शक्यता आहे.