Fri, Jul 10, 2020 16:48होमपेज › Aurangabad › लग्नासाठीचे दिड लाख घेऊन वधू पसार

लग्नासाठीचे दिड लाख घेऊन वधू पसार

Published On: Dec 30 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 12:10PM

बुकमार्क करा
गंगापूर :  प्रतिनिधी

सध्या लग्‍नासाठी मुली मिळत नसल्याने मुली ऐवजी मुलांच्या बापांना हुंडा द्यावा लागत आहे. यामुळे मुली मिळविण्यासाठी वाटेल तितके पैसे देण्याची तयारी काही तरूण करीत आहेत. असाच काहीसा प्रकार गंगापूर तालुक्यातील घोडेगाव येथे घडला. 

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या एका तरुणाला लाखोंचा गंडा घालून लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी नवरीसह तिच्या नातेवाईकांनी धूम ठोकल्याचे प्रकरण समोर आले आहे. फसवणूक झालेला तरुण सध्या न्यायासाठी पोलिस  ठाण्याचे  खेटे मारत आहेत.  

गंगापूर तालुक्यातील घोडेगाव येथील राहिवासी रामेश्वर रूपचंद तेजीनकर त्याचा भाऊ  नियोजित नवरदेव सोमनाथ तेजीनकर याच्यासह सर्व कुटुंबीयांना गंगापूर येथील कुमावत व परळी वैजीनाथ येथील मिनाक्षी नावाच्या महिलेच्या मदतीने 16 डिसेंबर रोजी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम ठरला होता. मात्र काही कारणाने हा कार्यक्रम लांबणीवर पडल्याने सर्व कुटुंबीय माघारी घोडेगावला येथे परतले.

त्यानंतर 18 डिसेंबर रोजी मिनाक्षी नावाच्या महिलेने रामेश्वरला फोन करून तुमची लग्नाची तयारी असेल तर दीड लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्याला रामेश्वरने होकार दिला. त्यानंतर 19 डिसेंबर रोजी नवरी मुलगी पूजा ज्ञानेश्वर शेरे, आई यांच्यासह चार महिला व चार पुरुष घोडेगाव येथे रामेश्वरच्या घरी आले. तिथे बोलणी होऊन लग्न ठरले. 20 डिसेंबर रोजी नवरीकडील मंडळींनी ठरल्याप्रमाणे रोख एक लाख रोख, 30 हजारांचे दागिने, 20 हजारांचे कपडे असे एकूण दीड लाख रूपये घेतले. त्यानंतर कायगाव रामेश्वर मंदिरात रितीरिवाजाप्रमाणे सोमनाथ तेजीनकर व पूजा शेरे यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर  येथील एका हॉटेलमध्ये सर्वांचे जेवणही झाले. त्यानंतर नववधूसह सर्व नातेवाईक घोडेगाव येथे आले. लग्नाच्या तिसर्‍या दिवशी 23 डिसेंबर रोजी सत्यनारायणाचा कार्यक्रमही पार पाडला.

संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पूजाला तिची आई छायाबाई हिचा फोन आला. तुझ्या वडिलाची प्रकृती जास्त गंभीर असल्याचे आईने पुजाला सांगितले. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे कळाल्यानंतर रामेश्वर पूजासह बोलेरो गाडीने बीडकडे रवाना झाले. बीडमध्ये नवरी पूजा व तिच्यासोबत असलेल्या मावशीने लघुशंकेचे कारण सांगत गाडी थांबवली. गाडी थांबवताच पूजाच्या आईने अगोदरच उभ्या केलेल्या इंडिका कारने (एमएच 47 डी 1998) सर्व जण पळून गेले.

ही बाब वेळीच लक्षात येताच रामेश्वर इंडिका कारच्या दिशेने धावला. मात्र गाडीतील अनोळखी व्यक्तींनी रामेश्वर यास मारहाण केली. रामेश्वरला कारमध्ये तलवारी दिसल्याने त्याने बीड येथून पळ काढत घोडेगाव गाठले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच 25 डिसेंबर रोजी रामेश्वर व त्याचा भाऊ नवरदेव सोमनाथ तेजीनकर यांनी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र त्यांना पोलिसांनी बीड येथे जाण्याचा सल्ला दिला. फसवणूक करणार्‍यांपासून माझ्या कुटुंबीयांस पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी रामेश्वर याने पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.