Wed, Jul 08, 2020 08:58होमपेज › Aurangabad › वेरुळ येथे तीन जण अटकेत, एक कोटी किमतीची मालमत्ता जप्त.

औरंगाबादेत वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी; वनविभागाची कारवाई 

Published On: May 09 2019 10:43PM | Last Updated: May 09 2019 10:43PM

औरंगाबाद : प्रतिनिधी

वन्य प्राणी अपराध नियंत्रण ब्युरो मुंबई व वनविभाग औरंगाबाद यांच्या संयुक्‍तविद्यमाने, गुरूवारी दि.9 वेरुळ येथे वन्य प्राण्यांची तस्करी करणार्‍या तीन जणांवर कारवाई करण्यात आली. मांडूळ, काळविटाची 4 शिंगे, दोन काळवीट प्रजातीचे कातडे (मोठ्या प्राण्याचे व छोट्या प्राण्याचे) व एक मोटारसायकल मिळून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची रक्‍कम जवळपास एक कोटीची आहे. तिन्ही आरोपींवर वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशन आजम गोंधळे (35, रा. सवंदगाव, ता. वैजापूर), शिवाजी माधु निकम (50,रा. सवंदगाव, ता. वैजापूर), किरण गोपीनाथ पवार (रा. सडे, ता. कोपरगांव) अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई यांना वेरुळ येथे प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करण्यात येते अशी माहिती मिळाली. त्यानुसार गुरूवारी दि.9 वनविभाग औरंगाबाद यांच्या मदतीने वेरुळ येथे सापळा रचण्यात आला. वेरुळ येथील घृष्णेश्‍वर लॉज समोर सायंकाळी सव्वा पाच वाजता तिन्ही आरोपींवर कारवाई करण्यात आली. 

सदर कारवाई मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उपवनसंरक्षक सतीश वडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी वाईल्ड लाईफ क्राईम ब्युरो पश्चिम क्षेत्र मुंबईचे वन्यजीव निरीक्षक दोकी आदीमल्लय्या, हेड कॉन्सटेबल सपन मोहन, विजय नंदेश्‍वर, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत वरुडे, सहाय्यक वनसंरक्षक आनंद गायके, वनपरिक्षेत्र अधिकारी, स्ट्राईक फोर्स, वनपाल आर. एच. दारुंटे, कैलास जाधव, नंदू तगरे, वनरक्षक एकनाथ शिरसाठ, मनोज कांबळे, महेश चौधरी, साईनाथ पवार, प्रशांत निकाळजे, सोमनाथ बर्डे, रेखा बरबडे यांचा सहभाग होता.