Mon, Jul 06, 2020 05:01होमपेज › Aurangabad › आधी रस्त्यावरचा कचरा उचला

आधी रस्त्यावरचा कचरा उचला

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 1:10AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील रस्त्यांवर शेकडो टन कचरा पडलेला आहे. अवकाळी पावसामुळे या कचर्‍याला प्रचंड दुर्गंधी सुटली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाटीच्या 27 मशीन येतील तेव्हा येतील, आधी रस्त्यावरचा कचरा उचलावा. अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी सोमवारी (दि. 16) मनपाच्या सर्वसाधारण सभेत केली. तर, ड्राय वेस्ट ठेवण्यासाठी खासगी गोदामे किरायाने घ्या, मात्र तत्काळ हा प्रश्न निकाली लावा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले.

नारेगाव कचरा डेपो बंद झाल्यानंतर शहराची कचराकोंडी अद्यापही कायम आहे. शहरातील औरंगपुरा, पैठणगेट, जुना बाजार, शहागंज, पदमपुरासह अनेक भागांत रस्त्यावर कचर्‍याचे ढीग कायम आहेत. प्रभाग 1, 2 आणि 3 मध्ये कचर्‍यांची गंभीर स्थिती आहे. त्यामुळे संतप्‍त नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. नऊ प्रभागांत कचरा विल्हेवाटीसाठी 27 मशीन येणार आहेत. शिवाय कचर्‍यावर लवकरच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सुरू होणार आहे. ही आश्‍वासने पूर्ण होतील तेव्हा होतील. अगोदर रस्त्यावर जागोजागी पडलेला  कचरा उचला, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी सोमवारी (दि.16) सर्वसाधारण सभेत लावून धरली. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका असल्याने हा प्रश्न आता तरी निकाली काढावा. संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारावा, अशी आग्रही भूमिका नगरसेवकांनी घेतली. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी तत्काळ वॉर्ड अधिकार्‍यांकडून शहरातील कचरा परिस्थितीचा प्रभागनिहाय आढावा घेतला. यात जवळपास प्रत्येक प्रभागात शेकडो मेट्रिक टन कचरा पडून असल्याची माहिती वॉर्ड अधिकार्‍यांनी दिली.

Tags : Aurangabad, First, take, street, trash