Tue, Jul 07, 2020 17:44होमपेज › Aurangabad › छोटी कचरा प्रक्रिया यंत्रे दाखल !

छोटी कचरा प्रक्रिया यंत्रे दाखल !

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 29 2018 1:40AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी 50 टन क्षमतेच्या 9 छोट्या मशीन मंगळवारी (दि.28) शहरात दाखल झाल्या. सध्या या मशीन झोनमध्ये न बसवता पडेगाव, चिकलठाणा येथे पडून असलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वापरल्या जाणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. तसेच कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी आलेल्या तीन इच्छुक कंपन्यांच्या निविदा आज उघडल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येक झोननिहाय 3 अशा एकूण 27 प्रक्रिया मशीन शहरात बसविल्या जाणार आहेत. यापैकी 9 मशीन मंगळवारी (दि.28) शहरात दाखल झाल्या. नारेगाववासीयांच्या विरोधानंतर शहराच्या कचरा कोंडीला तब्बल सात महिन्यांचा कालावधी होत आला आहे. कचर्‍यामुळे शहराची राज्यभर नाचक्‍की झाली. राज्य शासनाने कचरा कोंडी सोडविण्यासाठी तातडीने 91 कोटींचा निधी मंजूर केला. त्यानुसार महापालिका पदाधिकारी, प्रशासन कचर्‍यावर प्रक्रिया करणारे मशीन आल्यानंतर कोंडी फुटेल असे वारंवार सांगत होते. दरम्यानच्या काळात मनपा प्रशासनाकडून कचरा कोंडी फोडण्यासाठी शेकडो बैठका घेण्यात आल्या. मात्र, अद्यापही शहराची कचरा कोंडीची समस्या सुटलेली नाही. 

शासनाने नियुक्‍त केलेल्या सनियंत्रण समितीने सुचविलेल्या शहर परिसरातील चार जागांवर शहराचा कचरा टाकला जात आहे, परंतु या प्रक्रिया केंद्रांवर साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे कुठलीच यंत्रणा नव्हती. त्यामुळे कचरा कोंडी सुटण्यास मार्ग नव्हता. दरम्यान, गेल्या महिन्यात प्रत्येक झोननिहाय 3 अशा एकूण 27 मशीन खरेदी करण्याची निविदा अंतिम करण्यात आली. नागपूर येथील वेस्टबीन सोल्यूशन या कंपनीला मशीनचे कंत्राट मिळाले. कंपनीने 27 पैकी पहिल्या टप्प्यातील श्रेडिंग, स्क्रीनिंग व बेलिंग अशा 9 मशीन मंगळवारी महापालिकेकडे पाठविल्या. सांगली येथील कंपनीच्या फॅक्टरीमधून निघालेल्या मशीन मध्यवर्ती जकात नाका येथे उतरविण्यात आल्या. 

आठवडाभराची प्रतीक्षा

केंद्रीय प्रक्रिया केंद्रावर शेड उभारणी, सिव्हीलची कामे सुरू असल्याने शहरातील कचर्‍यावर प्रत्यक्षात प्रक्रिया सुुरू करण्यासाठी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मशीन पुरविणार्‍या कंपनीमार्फतच कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

कचरा संकलन आणि वाहतुकीच्या तीन निविदा

शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी मनपातर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. दोन वेळेस निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिसर्‍यांदा निविदा काढण्यात आल्या. यावेळी मुंबईची अपॉर्च्युनिटी, बंगळुरूची पी गोपीनाथ रेड्डी व स्वच्छता कॉर्पोरेशन या तीन इच्छुक कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या. या निविदा आज उघडल्या जाणार आहेत. तसेच हर्सूल येथे ओपन टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प उभारण्यासाठी हायक्यूब मुंबई, एम-प्लस आणि मायोव्हेसल या तीन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या असून या निविदाही आज उघडल्या जाणार आहेत.