Fri, Jul 10, 2020 17:06होमपेज › Aurangabad › भाजप आमदार अतुल सावेंना जीवे मारण्याची धमकी

भाजप आमदार अतुल सावेंना जीवे मारण्याची धमकी

Published On: Jun 24 2018 12:15PM | Last Updated: Jun 24 2018 12:15PMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

‘भाजपच्या एका आमदाराचा खून करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. ते फक्‍त एका विशिष्ट जातीला प्रोटेक्शन देत आहेत. थांबवू शकत असेल तर मला थांबवा’ अशा धमकीची पोस्ट फेसबुकवर टाकल्याने एकच खळबळ उडाली. संभाजीराजे भोसले या नावाच्या खात्यावरून ही धमकी देण्यात आली असली तरी आरोपीचे खरे नाव संभाजी शिवाजी कवडे असे आहे. धमकीच्या पोस्टनंतर काहींनी कमेंट करून आमदाराचे नाव विचारले असता. त्यानेच आ. अतुल सावे यांच्या नावाचा उल्लेख केला. हा प्रकार समजल्यावर भाजप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 24) दुपारी 12.30 वाजता पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्याकडे धाव घेऊन कारवाईची मागणी केली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, खा. उदयनराजे भोसले यांचा कव्हर फोटो असलेल्या आणि संभाजीराजे भोसले नावाच्या फेसबुक खात्यावर शनिवारी (दि. 23) सायंकाळी 6.38 वाजता ही धमकीची पोस्ट टाकण्यात आली. या पोस्टला 40 मिनिटांत तीन लाईक्स आणि 8 कमेंट मिळाल्या. यात संतोष काळे पाटील नामक खात्यावरून तो आमदार कोण? अशी विचारणा केल्यावर धमकी देणार्‍याने आ. अतुल सावे यांचे नाव घेतले. पुढे मनोज चिंतामणी नावाच्या फेसबुक खात्यावरून मग सुपारी देण्याची भाषाही झाली. फेसबुकवर चाललेल्या या चॅटिंगमध्ये शिवराळ भाषेचाही वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यावर भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश नावंदर, प्रदेश प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, नगरसेवक शिवाजी दांडगे, मंगलमूर्ती शास्त्री, विजय शिंदे, भाजयुमोचे सचिन झवेरी, सतीश खेडकर, बाळू वाघमारे, शंतनू अहेकर, महेश राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटेे-घाडगे यांना निवेदन देत धमकी देणार्‍यावर आणि त्याच्याशी चॅटिंग करणार्‍यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली. 

तिघांविरुद्ध गुन्हा; संभाजी भोसले अटकेत

संभाजी कवडे हा युवराज छत्रपती संभाजीराजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड येथे संचालक म्हणून काम करतो. तो स्वतःचे नाव सांगताना संभाजीराजे शिवाजी भोसले असेच सांगतो. कवडे या आडनावाचा तो कधीही उल्लेख करीत नाही. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्याने पंतप्रधानांचा वध करणार, असे पत्र गृहमंत्रालयाला पाठविल्याची चर्चा आहे. तसेच, दोन महिन्यांपूर्वी त्याने दिल्लीत मंत्रालयातील एका अधिकार्‍याला फोन करून औरंगाबाद पोलिस आयुक्‍तालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे सांगून सर्वांची एकच भंबेरी उडवून दिली होती. दरम्यान, धमकीप्रकरणी आ. सावे यांच्या तक्रारीवरून संभाजी भोसले, मनोज चिंतामणी, संतोष काळे या तिघांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपी संभाजी भोसले याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले.