Fri, Sep 25, 2020 12:10होमपेज › Aurangabad › नोकर भरती घोटाळा : शासनाकडून मनपा आयुक्‍तांना कारवाईचे आदेश

नोकर भरती घोटाळा : शासनाकडून मनपा आयुक्‍तांना कारवाईचे आदेश

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

मनपातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती प्रकरणात पालिकेतील सहा अधिकार्‍यांवर ठेपका ठेवण्यात आला असून त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाने मनपा आयुक्‍तांना दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी याप्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल नुकताच विधिमंडळाला सादर केला होता. 

महानगरपालिकेत सन 2010 ते 2014 या काळात लाड समितीच्या शिफारशींनुसार सुमारे 240 कर्मचार्‍यांची भरती झाली. या भरतीत गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे दाखल झाल्या होत्या. विधिमंडळातही त्याबाबत प्रश्‍न उपस्थित झाले होते. त्यानंतर विधिमंडळाने याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तुकाराम मुंडे यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नियुक्‍ती केली. या समितीत एक उपायुक्‍त आणि एका लेखाधिकार्‍यांचा समावेश आहे.

मुुंडे आणि समितीचे इतर दोन सदस्य दोन वेळा औरंगाबादेत येऊन चौकशी करून गेले. दोन्ही वेळा मुंडे आणि इतर अधिकार्‍यांनी कागदपत्रांची तपासणी केली. तसेच काही आवश्यक कागदपत्रे सोबत नेली. त्यानंतर दोन वेळा त्यांनी मनपातील अधिकार्‍यांकडून काही कागदपत्रे पुणे येथे मागवून घेतली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी हा अहवाल विधिमंडळाला सादर केला. आता या अहवालात मनपातील सहा अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे.

तसेच शासनाने या अहवालाची दखल घेत मनपा आयुक्‍तांना पत्र पाठवून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहितीही विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. चौकशीदरम्यान मनपातील उपायुक्‍त रवींद्र निकम, पदनिर्देशित अधिकारी सी. एस. अभंग, नगर सचिव दीपक सूर्यवंशी, वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी, अय्युब खान यांसह अनेक अधिकार्‍यांच्या काळातील कागदपत्रांची चौकशी करण्यात आली होती. मात्र आता दोषी ठरविलेले अधिकारी कोण हे समजू शकलेले नाही.