Wed, Jul 08, 2020 15:13होमपेज › Aurangabad › केंद्रीय पथकांकडून दुष्काळाचा पंचनामा

केंद्रीय पथकांकडून दुष्काळाचा पंचनामा

Published On: Dec 06 2018 1:34AM | Last Updated: Dec 06 2018 1:34AM
औरंगाबाद :

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत व दुष्काळी उपाययोजना राबवण्यासाठी राज्य शासनाने केंद्राला पाठवलेले अहवालातील माहितीची सत्यता आणि सद्यःपरिस्थितीचा पंचनामाच केंद्रीय पथकातील अधिकार्‍यांनी बुधवारी केला. या पाहणी दौर्‍यात अधिकार्‍यांनी गंगापूर तालुक्यातील कोरडा पडलेला टेंभापुरी प्रकल्प, तसेच मुरमी आणि सुलतानपूर येथील शेतीपिकांची पाहणी केली. शेतकर्‍यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली.

राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी पैसेवारी अहवाल, पाऊस, पाणीसाठा यासह वनस्पती स्थिती निर्देशांक, मृद आर्द्रता, सत्यापन (ग्राउंड ट्रुथिंग) आदी विविध निकष लावले होते. प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचे सत्यापन (ग्राउंड ट्रुथिंग) केल्यानंतर आलेल्या निष्कर्षाआधारे राज्यातील 151 तालुके आणि 268 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील एकूण गावांपैकी रँडम पद्धतीने 10 टक्के गावांमध्ये ग्राउंड ट्रुथिंग करून घेतले होते. मोबाइल अ‍ॅपद्वारे पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्रे घेण्यात आली होती. ही छायाचित्रे घेताना जीपीएसआधारे त्या ठिकाणाचा रेखांश-अक्षांशाचीही नोंद घेण्यात आली होती. ग्राउंड ट्रुथिंग झालेल्या गावांपैकीच काही गावांना केंद्रीय पथकाने भेट देऊन राज्य शासनाच्या अहवालातील सत्यता पडताळली.