Sun, Aug 09, 2020 11:02होमपेज › Aurangabad › ‘समृद्धी’च्या शंभर कोटींवर जिल्हा बँकेचा डोळा

‘समृद्धी’च्या शंभर कोटींवर जिल्हा बँकेचा डोळा

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:24AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनापोटी वैजापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळणार्‍या शंभर कोटी रुपयांच्या मोबदल्यावर जिल्हा सहकारी बँकेची वक्रदृष्टी गेली आहे. रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजनेसाठी या शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जापोटी ही रक्‍कम बँकेकडे वळती करावी, अशी गळ बँकेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) घातली आहे.

वैजापूर तालुक्यातील 2,800 शेतकर्‍यांनी सातबारावर 25 वर्षांपूर्वी रामकृष्ण उपसा सिंचन योजनेसाठी 20 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले होते. शेतकर्‍यांनी कर्जाची मागणी केलेली नसतानाही परस्पर कर्ज उचलून त्याचा बोजा सातबारा उतारांवर लावण्यात आल्याच्या तक्रारी होत्या. 35 कोटी रुपयांचे कर्ज आता व्याज, चक्रवाढ  व्याजासह 100 कोटी रुपयांच्या घरात गेले आहे. रामकृष्ण उपसा सिंचन योजना पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी जिल्हा बँकेला 6 कोटी रुपयांचा निधीदेखील दिला आहे.

रामकृष्ण उपसा सिंचन योजनेचे कर्जदार असणार्‍या 98 शेतकर्‍यांच्या जमिनी समृद्धी महामार्गात जात असून, त्यांना तब्बल शंभर कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या घरात शंभर कोटी रुपयांची ‘समृद्धी’ येण्याचा सुगावा लागताच जिल्हा बँक खडबडून जागी झाली आहे. ‘या शेतकर्‍यांना मिळणार्‍या मोबदल्यातून कर्जाची रक्‍कम कपात करून घेऊन तिचा जिल्हा बँकेकडे भरणा करावा, असा प्रस्ताव आम्ही रस्ते विकास महामंडळास सादर केला आहे. महामंडळाच्या अधिकार्‍यांसोबत आमच्या दोन बैठकाही झाल्या असून, लवकरच सकारात्मक तोडगा निघेल’, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले.