होमपेज › Aurangabad › देवगिरी किल्‍ला, वेरूळ, अजिंठा लेणींना पर्यटन कर

देवगिरी किल्‍ला, वेरूळ, अजिंठा लेणींना पर्यटन कर

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 03 2018 12:02AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पर्यटकांना सुविधा देणे आणि ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या पर्यटन स्थळांना कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात दौलताबादचा देवगिरी किल्‍ला, वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्यांचा समावेश करण्यात आला असून मान्यतेसाठी यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच राज्य शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती पंचायत समिती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.

सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांना जिल्हा परिषदेकडून पर्यटन कर आकारण्यात येतो. या धर्तीवरच दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यासह जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा लेण्यांनाही कर आकारून ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात भर घालण्याचा विचार जि.प. प्रशासनाकडून करण्यात येत होता. यासाठी सहा महिन्यांपूर्वी अधिकारी, पदाधिकारी आणि काही सरपंचांच्या पथकाने सिंधुदुर्ग-विजयदुर्ग किल्ल्यांना भेट देऊन पर्यटन कर प्रणालीविषयी माहिती घेतली होती. 

मार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत देवगिरी किल्‍ला, वेरूळ आणि अजिंठा लेण्यांना कर आकारण्यासंदर्भाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास मान्यताही मिळाली. सभेची प्रोसिडिंग पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

प्रतिव्यक्‍ती पाच रुपये ः देवगिरी किल्‍ला, वेरूळ आणि अजिंठा लेण्यांना प्रतिव्यक्‍ती पाच रुपये जि.प. पर्यटन कर आकारला जाईल. सहा ते बारा वयोगटातील बालकांना तीन रुपये आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीस प्रतिविद्यार्थी एक रुपया, याप्रमाणे कर आकारणी केली जाईल. यातून प्रतिदिन दहा ते पंधरा हजार रुपयांचा महसूल जमा होण्याची अपेक्षा आहे. यातील 75 टक्के महसूल पर्यटकांना सोयी-सुविधा देण्यासाठी, तर 25 टक्के ग्रामपंचायतींच्या विकासासाठी वापरला जाणार असल्याचे सोळंके यांनी सांगितले.