Mon, Jul 06, 2020 23:24होमपेज › Aurangabad › नॉर्मल डिलीव्हरीसाठी गाठा घाटी

नॉर्मल डिलीव्हरीसाठी गाठा घाटी

Published On: Dec 31 2018 1:55AM | Last Updated: Dec 31 2018 1:24AM
औरंगाबाद : भाग्यश्री जगताप

आजकाल प्रसूती म्हटलं की सिझेरियन असेच गणित झाले आहे. मात्र, घाटीत वर्षभरात 17 हजार प्रसूतींपैकी केवळ 4 हजार सिझेरियन प्रसूती करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांसह अनेक खासगी दवाखाने आव्हानात्मक प्रसूती म्हणत महिलांना घाटीत रेफर करतात. त्यातूही घाटीने सिझेरियनचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे. 73 टक्के महिलांची नैसर्गिक प्रसूती वर्षभरात झाली आहे.

शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे प्रसूती विभाग. रुग्णालयात वर्षभरात 17 हजार 184 प्रसूती करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 12 हजार 806 महिलांची नैसर्गिकरीत्या प्रसूती करण्यात आली, तर 4 हजार 308 महिलांची सिझेरियन प्रसूती करण्यात आली आहे. 

प्रसूतीबाबत महिलेची केस गुंतागुंतीची असेल तरच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये किंवा उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना घाटीत पाठविले जाते. सर्वाधिक गुंतागुंतीच्या प्रसूतीच्या केसेस येत असूनही या वर्षात घाटीत सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण केवळ 27 टक्के आहे. याउलट चित्र खासगी रुग्णालयांतील आहे. खासगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर सिझेरियन करून प्रसूती केली जाते. त्यात अनेकदा सिझेरियनची गरज होती का हे तपासणेही गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

मॉनिटिरिंग सिस्टीममुळे पोटात असलेल्या बाळाविषयी सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळे नॉर्मल प्रसूती सहज शक्य आहे. मात्र, अनेकदा नातेवाईकही बाळ व आई सुखरूप राहावे म्हणून सिझेरियनची मागणी करतात. त्यामुळे हे प्रमाण वाढत आहे. मुख्यत्वेकरून क्रिटीकल केस असेल तरच सिझेरियन व्हावे. वर्षभरात झालेल्या सिझेरियनचे ऑडिट घाटीत केले जाते. त्यामुळे सिझेरियन झालेली प्रसूती खरेच करणे गरजेचे होते का? तसेच पुन्हा तशीच परिस्थिती आल्यास सिझेरियन कसे टाळता येईल यावर उपाय शोधले जातात.
    -श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूती विभाग प्रमुख, घाटी

आढावा : 1 जाने. ते 30 नोव्हें.2018
एकूण प्रसूती :17 हजार 184
नैसर्गिक प्रसूती : 12 हजार 806
सिझेरियन प्रसूती : 4 हजार 308
जन्मलेल्या मुली : 8 हजार 213
जन्मलेली मुले : 8 हजार 971

सिझेरियनची कारणे : बाळाचे डोके मोठे असून जन्ममार्ग लहान असल्यास, मूल आडवे किंवा पायाळू असल्यास, आईचा रक्‍तदाब वाढला, मधुमेह असेल तर, गर्भाशयाच्या तोंडावर गाठ असल्यास किंवा नाळ बाळाच्या मानेभोवती किंवा खाली सरकलेली असल्यास प्रसूतीत अडचण येते व त्यासाठी सिझेरियन करावे लागते. पोट व गर्भाशयास छेद घेऊन सिझेरियन प्रसूती केली जाते.