होमपेज › Aurangabad › पोलिसांच्या मदतीशिवाय दंगल अशक्य

पोलिसांच्या मदतीशिवाय दंगल अशक्य

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 1:26AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पोलिसांची मदत असल्याशिवाय कुठेही दंगल होणे शक्य नाही. त्यामुळे या दंगलीतही पोलिसांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. ही दंगल घडवून आणणार्‍या लच्छू पहेलवानला घाबरून जर पोलिस त्याला अटक करत नसतील तर पोलिसांनी आपली वर्दी काढून ठेवावी असे मत काँग्रेसचे खा. हुसेन दलवाई यांनी केला आहे. तसेच खा. खैरे व लच्छू पहेलवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणीही त्यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे.

औरंगाबाद शहर 11 मे रोजी रात्री शांत होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या धुसफुसीमुळे काही जणांनी ही दंगल एका समाजाला टार्गेट करून घडविली आहे. विशेष म्हणजे निवडणूक जवळ आली की, दंगल घडविली जात आहे. हे औरंगाबादेत नवीन नसून गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे. हा सर्व प्रकार स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू आहे.आताही सेनेला पाठिंबा दिलेल्या नगरसेविका यशश्री बाखरिया यांचे वडील लच्छू पहेलवान हे या भागात व्यवसाय करणार्‍या गरीब लोकांकडून बळजबरीने हप्‍ते वसूल करतात. त्याला एक खासदार मदत करतो, हे अशोभनीय आहे. या पहेलवानचे बॅकग्राउंड गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. त्याच्यावर एक 302 चा गुन्हा दाखल आहे. तरी तो मोकाट फिरतो. त्याला पोलिस पकडण्यास घाबरत असतील तर त्यांनी आपली वर्दी काढून टाकावी अशी सूचना दलवाई त्यांनी केली. तसेच पोलिसांनी हारिसचा मृतदेह रुग्णालयात असताना त्याच्या घरात आक्षेपार्ह घोषणाबाजी करून कोंबिंग ऑपरेशन करणे हा कायद्याचा दुरुपयोगच आहे. कायदा पाळा किंवा डंडे खा, हा नियम आहे, मात्र तो नियम पोलिस पाळत नसल्याने अशा दंगली होऊन निष्पाप लोकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊन लोकांचा जीव जातो. 

हा सर्व प्रकार सध्या सेना-भाजपच्या अंतर्गत वादामुळे होत आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे आम्ही जातीयवादी नाही असे म्हणतात, मग त्यांची महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून सत्ता आहे, मात्र इतर शहरांच्या तुलनेत विकास न दिसता असे प्रकार घडत आहेत. खा. खैरे यांच्यासह पहेलवान व त्याच्या मुलीला अटक करावी अशी मागणी खा. दलवाई यांनी पत्रकार परिषदेत केली.