Sat, May 30, 2020 00:47होमपेज › Aurangabad › विद्यमान, माजी सरपंचाच्या दोन गटांत तलवारीने हाणामारी 

विद्यमान, माजी सरपंचाच्या दोन गटांत तलवारीने हाणामारी 

Published On: Dec 29 2017 1:53AM | Last Updated: Dec 29 2017 1:42AM

बुकमार्क करा
पाचोड : प्रतिनिधी

राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आलेले पथक परत गेल्यानंतर विद्यमान आणि माजी सरपंचांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत काठ्या, कुर्‍हाडी व तलवारीचा सर्रास वापर करण्यात आला. यात विद्यमान सरपंचासह 13 जण जखमी झाले असून काही जण गंभीर अवस्थेत आहेत. ही घटना गुरुवारी (दि.28) दुपारी रांजणगाव दांडगा (ता.पैठण) येथे घडली. खबदारीचा उपाय म्हणून गावात चोख पोलिस बंदोबस्त आहे.  

सरपंच शेख रियाज (35), इसाक बादशाह (55), शेख राजू बादशाह, शेख अजीज अहमद, फय्याज शब्बीर शेख, इम्रान इसाक शेख, फेरोज शहा अहमद, फेरोज चांद शेख, अफसर शब्बीर शेख अशी गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्‍तीचे नावे असून राजू शामद शेख, कदीर इसाक शेख, इसाक अहमद शेख, शफी अहमद शेख हे किरकोळ जखमी आहेत. जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

याबाबत अधिक माहिती अशी, सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन सरपंच शेख अकील शामद यांच्या विरुद्ध विद्यमान सरपंच शेख रियाज बादशाह व माजी सरपंच अजीज अहमद यांनी अविश्वास ठराव पारित करून, सरपंच पदावरून पायउतार केले होते. त्याचा रोष शेख अकील व त्याच्या कुटुंबीयांच्या मनात सलत होता. अशातच तत्कालीन सरपंच अकील शेख यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या राष्ट्रीय पेयजल पाणी पुरवठा योजनेत त्यांच्या काळात 2 लाख 71 हजार तीनशे रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने ही योजना धूळखात पडून होती. विद्यमान सरपंच शेख रियाज यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणी पुरवठा अभियंत्याकडे गैरकारभाराची तक्रार करून कार्यवाइची मागणी केली होती.

त्यानुसार पाणीपुरवठा अभियंता यांनी चौकशी समिती नियुक्त करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी (दि.28) चौकशी पथक रांजणगाव येथे आले व त्यांनी तत्कालीन सरपंंच शेख अकील यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभाराची विद्यमान सरपंच शेख रियाज यांना समक्ष बोलावून चौकशी सुरू केली. या प्रसंगी माजी सरपंच शेख अकील व त्यांच्या कुटुंबीयांनी विद्यमान सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

गावातील काही नागरिकांनी समजूत घालून त्यांचे भांडण मिटवले. चौकशी पथक गावातून परत जाताच माजी सरपंच शेख अकील व त्यांच्या कुटुंबीयांनी विद्यमान सरपंच शेख रियाज व त्याचे कुटुंबीयांवर काठ्या कुर्‍हाडी व तलवारीने हल्ला चढवला. यात सरपंच शेख रियाज यांच्यासह सदर 13 जण जखमी झाले.  दरम्यान,  शुक्रवारी जवाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सपोनि. महेश आंधळे यांनी सांगितले.