Fri, Jul 03, 2020 16:10होमपेज › Aurangabad › विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकास चोप

विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकास चोप

Published On: Aug 16 2019 5:09PM | Last Updated: Aug 16 2019 5:05PM

मुख्याध्यापक नागोराव कोंडीबा काकळे पिशोर (औरंगाबाद) :  प्रतिनिधी

चिंचोली लिंबाजी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नागोराव कोंडीबा काकळे हा मागील काही दिवसापासून शाळेतील अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करीत होता. या प्रकाराविषयी मुलींनी काही पालकांना कल्पना दिली होती. परंतु मुलींचा गैरसमज झाला असावा आणि मुलींचा प्रश्न म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतू मागील पंधरा दिवसापासून चौथीच्या वर्गातील एक मुलगी शाळेत जाण्यास टाळाटाळ करत होती. सदर मुलगी कायम भीतीच्या वातावरणात राहत असल्याचे लक्षात आल्याने तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन बोलते केले. तेव्हा शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा हा भयंकर प्रकार उघडकीस आला.  

या प्रकाराविषयी अधिक माहिती घेतली असता,या घृणास्पद प्रकाराला ही मुलगी एकटीच बळी पडली नसून अजून अनेक मुली असा त्रास सहन करीत असल्याची संतापजनक माहीती समोर आली. या प्रकाराला बळी पडलेल्या तीन मुलींनी धाडस करून समोर येत हा सर्व प्रकार कथन केला. यावेळी संतप्त नागरिक, महिला व पालकांनी मुख्याध्यापकास स्वातंत्रदिनी पहाटेच शाळेत जाऊन चांगला चोप दिला. शाळेत तणावपूर्ण परस्थिती निर्माण होताच पोलिस पाटील निलेश बलसाने आणि इतर काही नागरिकांनी काकळेस एका वर्गखोलीत बंद करून मारहाणीचा प्रकार रोखला. पोलिस पाटील बलसाने यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देताच पिशोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश पवार हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुख्याध्यापकास ताब्यात घेतले.  

पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक काकळेविरुद्ध कलम 354,354 (अ) (1), कलम 8,10 (POCSO) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. सदरील गुन्ह्याचा तपास जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एम.आहेर करीत आहेत.