Thu, Jul 02, 2020 18:37



होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : भाजपच्या गायकवाडांनी अर्ज घेताच खैरे धास्तावले

औरंगाबाद : भाजपच्या गायकवाडांनी अर्ज घेताच खैरे धास्तावले

Published On: Mar 29 2019 5:52PM | Last Updated: Mar 29 2019 7:27PM




औरंगाबाद : प्रतिनिधी

शिवसेना-भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर युतीची घोषणा झाली. परंतु औरंगाबादेत स्थानिक पातळीवर अद्यापही सेनेच्या विरोधात अजूनही धूसफुस सुरूच आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी सेना, भाजप, रिपाई महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकजूट दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असले तरी भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज घेऊन एक प्रकारे खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात नाराजी अजूनही कायम असल्याचेच दाखवून दिले. त्यामुळे धास्तावलेल्या खैरेंनी तातडीने भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन शुक्रवारी दुपारी गायकवाड यांची भेट घेत मनोमिलनाचा प्रयत्न केला. 

स्वबळाचा नारा देत शिवसेनेने यंदा लोकसभा निवडणुकीसह राज्यातील सर्व निवडणुका स्वातंत्र लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे दोन्ही पक्षातून अनेक इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा दोन्ही पक्षांनी युती केली. त्यामुळे वर्षभरापासून लोकसभेच्या तयारीत मतदार संघ चार वेळा पिंजून काढणारे इच्छुक चांगलेच नाराज झाले आहेत. यात प्रमुख्याने भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा वरचा क्रमांक लागतो. 

खा. खैरेंची वाढणार डोकेदुखी , शांतिगिरी महाराजांसाठी सुचकाने नेला अर्ज

सेना-भाजपमध्ये सध्या मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी कामाला लागा, असा नारा देण्यात येत आहे. मात्र युतीचा निर्णय जिव्हारी लागलेले माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी सेना उमेदवार चंद्रकांत खैरेविरोधात उमेदवारी अर्ज घेऊन एक प्रकारे बंडाचाचे निशाण उभारले आहे. त्यामुळे खासदार खैरे चांगलेच धास्तावले आहेत. त्यांनी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधून गायकवाड यांना उमेदवारी दाखल करण्यापासून राखण्यात यावे, अशी मागणी केली.

शिवाय स्वतः भाजपच्या काही स्थानिक पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन गायकवाड यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांच्या मनोमिलनाचा प्रयत्न केला. मात्र अजूनही त्यांचे मनपरिवर्तन झाले की नाही हे स्पष्ट झालेले नाही. तेव्हा गायकवाडांचे मनपरिवर्तन करण्यात भाजप व सेनेच्या नेत्यांना कितपत यश येते हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

आम्ही समजूत काढली

भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज घेतला, हे सत्य आहे. परंतु तो अर्ज ते दाखल करणार नाहीत. आम्ही त्यांची समजूत काढली आहे. ते युतीच्या उमेदवारांसाठीच काम करणार आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली असल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरिष बोराळकर यांनी सांगितले.