Wed, Jul 08, 2020 17:22होमपेज › Aurangabad › औरंगाबाद:  पाणी टंचाईस कंटाळून महिलांचा हंडा मोर्चा

पाणी टंचाईस कंटाळून महिलांचा हंडा मोर्चा

Published On: May 06 2019 5:04PM | Last Updated: May 06 2019 5:04PM
विहामांडवा : प्रतिनिधी  

पैठण तालुक्यातील विहामांडवा या गावाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जवळपास २५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला २५ दिवसांतून एकदाच पाणी येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला आज (ता.६) रस्त्यावर उतरल्या आहेत. महिलांनी आज रिकामे हंडे घेवून ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. नियमीत घरपट्टी व पाणीपट्टी भरुन देखील पाणी मिळत नसेल तर आम्ही यापुढे कर न भरण्याचा निर्धार या महिलांनी केला आहे.

सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून पाण्यासाठी महिलांना व लहान बालकांना वणवण करावी लागत आहे. शेवटी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महिला़ंनी एकत्र येऊन आज सोमवारी हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला.

जोपर्यंत पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही अशी महिलांनी भूमिका घेतली होती. ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आता पाणी टँकर सुरू करण्यात यावे. दरम्यात याकडे आता सरपंच, ग्रामसेवक यांनी लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे. विहामांडवा गावात गेली २० ते २५ दिवस नळाला पाणी येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने नळाला पाणी येत नसल्यामुळे विकतचे पाणी घेण्याची विहामांडवा गावातील गावकऱ्यांवर वेळ आली आहे. त्यामुळे  पाणी जर घ्यायचे असेल एक ड्रमसाठी ५० रूपये मोजावे लागतात.

दुष्काळ पडल्यामुळे आम्हाला काम नाही काम नसल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात जर पाणी सुध्दा विकत घ्यावे लागत आहे. असे असेल तर आम्ही जगावे कसे.कधी आमच्या विहामांडवा गावाचा पाणी प्रश्न सुटेल आणि पाण्यासाठी आम्ही महिलांनी किती भटकंती करायची असे वेगवेगळे प्रश्न मांडत संतप्त महिलांनी सरपंच व ग्रामसेवक यांना धारेवर धरले.

विहामांडवा गावाला चार विहिरी असताना देखील पिण्याच्या पाण्याचा व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे आज गावाला पाण्यासाठी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. जर ग्रामपंचायतने अगोदरच मार्च -एप्रिलमध्ये व्यवस्थीत नियोजन केले असते तर आज गावकऱ्यांनी आंदोलन करण्याची वेळ आली नसती.  -

ॲड. राहुल धायकर

टँकरचा प्रस्ताव आम्ही सादर केला आहे. तसेच एक दोन दिवसात आपल्याला ३ टँकरच्या सहा खेपा होणार आहे. तसेच गावातील जे हातपंप खराब आहेत त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे एक दोन दिवसात पाणी व्यवस्थीत नियोजन आम्ही करणार आहोत.   

किशोर पाठे (ग्रामसेवक विहामांडवा)

या गावाची अवस्था खूप बिकट झाली आहे. पैसा, योजना येऊन गेली तरी पण या ग्रामपंचायतीने कोणताही योजनेची व्यवस्थीत उपाय योजना केली नाही.  

बबनबाई गुलाब गाभुड

आम्हला रोज ५०-१०० रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागते.परंतु काम नाही, पाऊस पडला नाही,शेती पिकली नाही पैसा अनायचा कोठून आम्ही का डाके घालायचे का? 

सलमा शेख, इंदिरानगर, विहामांडवा

अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजनामुळे व विहिरीतील पाणी अटल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.दुष्काळ परिस्थितीमुळे विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे.वीस -पंचवीस दिवस झाले तरीही नळाला पाणी आले नाही.त्यामुळे संतप्त महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसमोर हंडा मोर्चा काढला.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असताना ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी २ मे रोजी सरपंच यांच्याकडे निवेदन देऊन सात दिवसाच्या आत पाण्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा हंडा मोर्चा करण्याचा इशारा दिला होता.मात्र याकडे ग्रामसेवक व सरपंच यांनी दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.

     राजेंद्र पन्हाळकर