Sat, Sep 19, 2020 10:45होमपेज › Aurangabad › 'औरंगाबादसह आठ जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक, खासगी तज्ज्ञ डॉक्टरांनाही समन्स बजावून बोलवा'

'औरंगाबादसह आठ जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक, खासगी तज्ज्ञ डॉक्टरांनाही समन्स बजावून बोलवा'

Last Updated: Jul 25 2020 4:47PM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि औरंगाबाद या शहरात चिंताजनक परिस्थिती असून त्यावर प्रशासन योग्यरित्या काम करीत आहे. मात्र यात आता खासगी रुग्णालयेच नाही तर त्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनाही सोबत घेण्यात यावे. आपत्ती कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना समन्स बजावून सेवा देण्याचे आदेश द्यावेत, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत प्रशासनाला दिला. 

देशातील तमिलनाडू, कर्नाटक, बंगाल, महाराष्ट्र यासह इतर काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सतत कमी-अधिक होत आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी चिंता वाढावी, अशीच स्थिती कायम आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा तर आठ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती काळजी करण्यासारखी आहे. औरंगाबादचाही त्यामध्ये समावेश असल्याने येथील आढावा घेण्यासाठी आपण आलो असल्याचे सांगत खा. पवार म्हणाले की, राज्यात रुग्ण वाढ रोखण्यासोबतच कोरोनामुळे होणारे मृत्यूदर कमी करण्यावर जास्त भर दिला जात आहे. औरंगाबादेत काय आवश्यक आहे, त्याची संपूर्ण माहिती घेतली आहे. त्याबाबत आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती सादर करणार असल्याचे ते म्हणाले.

ऑगस्ट महिन्यात रुग्ण संख्या वाढेल, असा अंदाज आरोग्य जाणकारांनी दिला आहे. त्यानुसार औरंगाबादेत आवश्यकतेनुसार बेड उपलब्ध आहेत का, याची माहिती आपण आवर्जून घेतली आहे. त्यात असे लक्षात आले की, येथे बेडची आवश्यकता लागणार आहे. ही व्यवस्था प्रशासनाने करावी, अशीही सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.  

मला एका ठिकाणी करमत नाही...

कोरोना संकटात आपण सर्वत्र फिरून आढावा घेत आहात. परंतु मुख्यमंत्री अद्याप कुठेही दिसेनात, अशी टीका विरोधक करीत आहेत, सवा शरद पवारांना पत्रकारांनी  केला असता ते म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिवसरात्र कोरोनाचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोरोनासारख्या महामारीच्या काळात एकाच ठिकाणी बसून परिस्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यांचे सर्व जिल्ह्यावर लक्ष आहे, आणि राहिला प्रश्न माझ्या दौऱ्यांचा, तर मला एका ठिकाणी करमत नाही, मी सतत माणसात राहतो. त्यामुळे कधीही एका ठिकाणावर बसलो नाही.  तसेच आपल्या पडत्या काळात औरंगाबाद, बीडसह इतर काही जिल्हे असे आहेत की, त्यांनी खूप काही दिले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील संकट व आपल्या लोकांच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी आपण आलो आहोत, असेही ते म्हणाले.

 "