Thu, Jul 02, 2020 10:35होमपेज › Aurangabad › औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा थांबवला

औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा थांबवला

Published On: Dec 27 2018 12:59PM | Last Updated: Dec 27 2018 12:59PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

नोटीस बजावूनही महानगरपालिकेने पाणीपट्टी न भरल्याने जलसंपदा विभागाकडून गुरुवारी जायकवाडी धरणातील पाणी उपसा टप्प्या टप्प्याने कपात करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. जायकवाडी धरणावरील मनपाचे दोन्ही पंपगृह दोन तासांसाठी सील करण्यात आले. दोन तासानंतर पुन्हा सील उघडण्यात आले. मनपाने थकबाकी न भरल्यास ३१ डिसेंबर रोजी पालिकेचा संपूर्ण पाणी उपसा बंद इशारा देण्यात आला. 

औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी मनपाने जायकवाडी धरणावर १५६ एचडी क्षमतेच्या दोन योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्याद्वारे रोज १४० एम एम एल डी इतका पाणी उपसा केला जातो, परंतु महानगरपालिकेने मागील पाच वर्षांपासून या पाणी उपशाचे शुल्क जलसंपदाकडे भरलेले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने पंधरा दिवसांपूर्वी महानगरपालिकेला नोटीस बजावून पाणी उपसा बंद करण्याचा इशारा दिला होता. 

जलसंपदाचे मनपाकडे आठ कोटी रुपये थकलेले आहेत. ही थकबाकी पालिकेने त्वरित भरावी अन्यथा २७ डिसेंबर पासून टप्प्या टप्प्याने पाणीकपात करण्यात येईल आणि ३१ डिसेंबर रोजी संपूर्ण पाणी उपसा बंद केला जाईल , असे या नोटीशीत बजावले होते. परंतु त्यानंतरही पालिकेने ही थकबाकी भरली नाही. त्यामुळे दिलेल्या इशाऱ्यानुसार जलसंपदा खात्याने गुरुवारी सकाळी दोन तासांसाठी पालिकेचा उपसा थांबविला. त्यासाठी दोन्ही पंप ग्रहांना सील करण्यात आले होते.