Sat, Jul 11, 2020 13:32होमपेज › Aurangabad › दोन वीज चोरांची हर्सुल कारागृहात रवानगी

दोन वीज चोरांची हर्सुल कारागृहात रवानगी

Published On: Mar 12 2019 7:37PM | Last Updated: Mar 12 2019 7:20PM
औरंगाबाद :  प्रतिनिधी 

वीज चोरी प्रकरणात वारंवार समन्स बजावूनही  न्यायालयात गैरहजर राहणार्‍या दोघा वीज चोरांना करमाड पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  त्यानंतर दोघांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली. 

औरंगाबाद तालुक्यातील देमणी वाहेगाव येथील किरण साहेबराव अंबिलढगे याने २०१७ मध्ये घरगुती वापरासाठी १ हजार ६३० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरणने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही आरोपी हजर राहिला नाही. न्यायालयाने अखेर अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर करमाड पोलिसांनी अंबिलढगेला सोमवारी (११ मार्च) ला अटक केली. त्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद दिग्रसकर यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

दुसर्‍या एका प्रकरणात औरंगाबाद तालुक्यातील कोनेवाडी येथील अंकुश तात्याराव आगलावे याने २०१७ मध्ये घरगुती वापरासाठी ३ हजार ४२०  रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरणने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी समन्स बजावूनही आरोपी हजर राहत नसल्याने, न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. करमाड पोलिसांनी आगलावे यांना मंगळवारी (१२ मार्च) ला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद दिग्रसकर यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. दोन्ही प्रकरणात महावितरणच्या वतीने अ‍ॅड.केवल डोंगरे यांनी काम पाहिले.