Mon, Aug 03, 2020 14:56होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : धनगर आरक्षणाप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार अंत्यविधी

'...तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्यविधी'

Published On: Dec 18 2018 2:30PM | Last Updated: Dec 18 2018 2:32PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी झटणाऱ्या मंजीत कोळेकर (वय ५० वर्षे) यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार महाडा कॉलनी भागात सोमवारी उघडकीस आला होता. या प्रकरणाने आता धनगर समाजाच्या वतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. मंजीत कोळेकर यांना शहीद घोषित करून त्यांच्या परिवाराला ५० लाखांची आर्थिक मदत दोन तासाच्या आत घोषित करण्यात यावी, अन्यथा औरंगाबाद जिल्हाधिकार्‍यांसमोर कोळेकर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे, असे सकल धनगर समाजाच्या वतीने पत्रक जारी करण्यात आले आहे.

कोळेकर हे मागील अनेक वर्षापासून धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यरत होते. त्यांनी अनेक वेळा आरक्षणासाठी मंत्री शासकीय पातळीवर निवेदने, आंदोलने केली. ते समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात नेहमी सक्रिय राहत, मात्र यातून त्यांनी सोमवारी गळफास घेवून आत्महत्या केली. तपासणी दरम्यान रजिस्टरमध्ये आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख सापडला आहे.

 त्यानंतर समाज स्तरावर समाज बांधवांनी एकत्र यायला सुरुवात केली आहे. घाटीतील शवविच्छेदन गृहाबाहेर धनगर समाजाच्या शेकडो बांधवांनी कोळेकर यांना शहीदाचा दर्जा मिळाला पाहिजे, तसेच त्यांच्या कुंटुबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी आणि कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी निदर्शने करण्यात येत आहे. या मागण्या दुपारी दोन वाजेपर्यंत प्रशासनाने मान्य न केल्यास त्यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरण रचून कोळेकर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहतील असे पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.