Thu, Jul 09, 2020 22:08होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत ६२, जालन्यात ६३ टक्के

औरंगाबादेत ६२, जालन्यात ६३ टक्के

Published On: Apr 24 2019 1:36AM | Last Updated: Apr 24 2019 1:23AM
औरंगाबाद/जालना ः प्रतिनिधी

औरंगाबाद मतदारसंघात मंगळवारी (दि. 23) सरासरी 61.87 टक्के मतदान झाले, तर जालन्यात सायंकाळपर्यंत जवळपास 63 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. औरंगाबाद मतदारसंघात ईव्हीएम बंद पडल्याचे तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान झाले.

औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्यात चौरंगी लढत झाली. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत सरासरी 8.34 टक्के मतदान झाले. ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारींमुळे काही केंद्रांवर मतदान संथ गतीने होत होते. अकरा वाजेपर्यंत सरासरी 18.80 टक्के मतदान झाले. केंद्रांवर मंडप तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, अनेक केंद्रांवर पाण्याअभावी मतदानाचे हाल झाले. दुपारी एक वाजेनंतर 28 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. सायंकाळी सहा वाजल्यानंतरही अनेक केंद्रांवर रांगा कायम होत्या. औरंगाबाद मतदारसंघात सरासरी 61.87 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. 

जालना मतदारसंघात काही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. जालना शहरात सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह होता. भाजपचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांनी मतदान केले. जालन्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मतदान केले. मतदारांना पोलचिटचे वाटप न झाल्याने अनेक ठिकाणी मतदारांना अडचणी आल्या. सकाळी संथ गतीने मतदानास सुरुवात झाल्यानंतर मतदानाच्या टक्केेवारीत वाढ होत गेली. सकाळी 9 वाजेपर्यंत 9.23 टक्के, 11 वाजेपर्यंत 23.33 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 37.58, 3 वाजेपर्यंत 49.39 टक्के, तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा टक्‍का  65 टक्क्यांपर्यंत पोहोचला. जालन्यातील डॉ. फ्रेजर बॉइज, जुना जालन्यातील उर्दू हायस्कूल, बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण, उजैनपुरी, म्हात्रेवाडी, जाफराबाद तालुक्यातील अकोलादेवसह अंबड शहरातील दोन केंद्रांवर ईव्हीएम बंद पडले. बदनापूर तालुक्यातील हिवरा, भोकरदन तालुक्यातील देहेड व तळणी येथे नवरदेवांनी मतदानाचा हक्‍क बजावला. 

अंबड तालुक्यातील खडकेश्‍वर येथे एकाने मतदान करताना ईव्हीएमचे छायाचित्र काढून व्हायरल केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.