Fri, Dec 13, 2019 21:50होमपेज › Aurangabad › नोटाबंदीमुळे पाचोडमधील जनावरांचा बाजार अडचणीत

नोटाबंदीमुळे पाचोडमधील जनावरांचा बाजार अडचणीत

Published On: Dec 21 2018 1:21AM | Last Updated: Dec 21 2018 12:29AM
पाचोड : प्रतिनिधी 
हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे मराठवाड्यात प्रसिद्ध असलेला पैठण तालुक्यातील पाचोड येथील जनावरांचा बाजार अडचणीत सापडला आहे. गेल्या रविवारी पाच हजारांवरून अवघ्या हजार जनावरांची आवक दिसून आली. नोटांच्या अडचणीमुळे खरेदीदारांनी या बाजाराकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहवयास मिळाले.

सर्वाधिक मोठा जनावरांचा आठवडी बाजार म्हणून पाचोडचा उल्‍लेख केला जातो. दर रविवारी भरणार्‍या या बाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीतून कोटयवधी रुपयांची उलाढाल होते. औरंगाबादसह परजिल्ह्यातूनही जनावरे खरेदी-विक्रीसाठी या बाजारात आणली जातात. शनिवारी बाजार भरण्याची प्रक्रिया सुरु होते. रविवारी मोठया प्रमाणात गुरांची खरेदी-विक्री होऊन सायंकाळी बाजार संपतो. ही प्रक्रिया कित्येक वर्षांपासून सुरु आहे. गायी, म्हशी, बैल, शेळ्या आदी जनावरे या बाजारात  विक्रीसाठी उपलब्ध असतात.  विशेषत: या बाजारात देवणी, लाल कंधारी, सोटरी, संकरित, खिल्लारी व गावरान अशा विविध जातीच्या जनावरे विक्रीसाठी येत असतात. मात्र, केंद्र सरकारने रद्द केलेल्या पाचशे  हजार रुपयांच्या नोटांमुळे या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. चलनबंदीच्या निर्णयानंतर  मागील रविवारचा पहिलाच बाजार 75 टक्क्यांवर येवून ठेपला होता. तर कालचा रविवारचा बाजार 25 टक्क्यापर्यंत घसरला. प्रत्येक बाजारात सरासरी चार ते पाच हजारांपेक्षा अधिक जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र, यावेळी बाजारात केवळ  हजार- पाचशे जनावरे आली होती. खरेदीदारांनीही चलन नसल्यामुळे बाजाराकडे पाठ फिरविली, हेच यावरून दिसून येते. परिणामी कमी किमतीत जनावरे विक्री झाल्याची माहिती पशुपालकांनी दिली.