Tue, Jun 15, 2021 11:28होमपेज › Aurangabad › अंधारी तलाठी कार्यालयाला कुलूप असल्याने शेतकरी संतप्त 

अंधारी तलाठी कार्यालयाला कुलूप असल्याने शेतकरी संतप्त 

Published On: Jul 10 2019 7:45PM | Last Updated: Jul 10 2019 7:45PM
अंधारी : प्रतिनिधी 

अंधारी तलाठी कार्यालयात पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गावातील तलाठ्याकडून पिळवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. येथील तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची उतारा काढण्यासाठी आणि विविध कागदपत्रांवर सहीसाठी सर्रास लूट केली जात असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात असल्याचे शेतकरी समाधान तायडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. 

सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शेतकऱ्यांना उतारा काढण्यासाठी ३० रुपये, सहीला २० रुपये आणि पीक विमा अर्जासाठी शेतकऱ्यांना वेगळे असे १० रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच एका शेतकऱ्याला साधारण किमान सत्तर रुपये खर्च येत आहे. नियमानुसार या सर्व प्रक्रियेसाठी पंधरा रुपये खर्च येतो. म्हणजेच एका शेतकऱ्याकडून साधारण ४५ रुपये जास्त घेतले जात आहेत. तलाठ्याने गावातील तलाठी कार्यालयात उपस्थित राहून उतारा देणं अवश्यक आहे. मात्र तलाठी औरंगाबाद या ठिकाणी आपल्या सोईने थांबतात.

सेतू सुविधा केंद्रातून मिळणारी ई महाभूमीलेखच्या संगणीकृत सातबाऱ्यांवर शेतकऱ्यांची विविध कामे होत होती. परंतु जमिनीच्या खरेदी विक्रीत काही महाशयांनी याचा दुरुपयोग केल्याचे निदर्शनास आल्यामुळे यामुळे सातबारा बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तलाठी फेरफार वरून सातबारा उतारे देण्याचे आदेश दिल्याने तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांना दररोज तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. यात ये जा करण्याचा खर्च, तलाठ्याचा खर्च आणि आणि ऑनलाइन विमा भरण्यासाठी वेगळा खर्च होत असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. 

पीकविमा भरण्याची मुदत चोवीस जुलै असल्याने त्या तलाठी दररोज अंधारी येथील तलाठी  कार्यालयात थांबत नसल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे. राज्य सरकारने चोवीस जुलै ही विमा भरण्याची अंतिम मुदत दिल्याने अवघ्या तेरा दिवस शिल्लक उरले असल्याने शेतकऱ्यांची तलाठी कार्यालयात एकच गर्दी होत आहे. बुधवार ( दि.१०)साडेबारा वाजले तरी तलाठी न आल्याने शेतकरी संतप्त झाले होते. अंधारी येथील तलाठी गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिल्या. यावेळी सरपंच विजय गोरे भानुदास तायडे शिवाजी तारडे विष्णू तायडे धोंडीराम जाधव सांडू तायडे लक्ष्मण गोरे समाधान तायडे अशोक तायडे भीमराव तायडे दिगंबर तायडे अशोक तायडे काळे मामा आदींची उपस्थिती होती.