Sun, Jul 05, 2020 15:26होमपेज › Aurangabad › निवडणूक कामासाठी सुमारे दोन हजार वाहने लागणार

निवडणूक कामासाठी सुमारे दोन हजार वाहने लागणार

Published On: Mar 15 2019 7:38PM | Last Updated: Mar 15 2019 7:37PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. विविध सरकारी कार्यालयाकडे विविध कामे सोपवण्यात आली आहेत. वाहतूक व्यवस्थेचे नोडल ऑफिसर म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी लागणार्‍या वाहनांची व्यवस्था आरटीओ कार्यालयांच्या वतीने करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे दोन हजार वाहने लागणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली. 

आरटीओ कार्यालयाने निवडणुकीसाठी लागणार्‍या वाहनांच्या नियोजनाचे काम आज पासूनच सुरू केले असून ऐन वेळी खासगी वाहनांचाही वापर करण्यात  येणार आहे. मतपेटी वाहणे, कर्मचार्‍यांची ने आण करणे, व इतर तपासणिक अधिकारी, व इतर कामांसाठी या वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. या कामी खासगी वाहनांसोबतच एसटी महामंडळाच्या बसेसचीही मदत घेतली जाते. या वाहनांना निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले भाडे त्यांना दिले जाते, अशीही माहिती मेत्रेवार यांनी दिली. 

वाहनांचे नियोजन सुरू 

निवडणुकीसाठी विविध यंत्रणा जिल्हाभर कार्यरत राहणार आहे. त्यांच्या ने आण करण्याची व मतपेट्या पोहचवणे व आणून जमा करणे यासाठी लागणार्‍या वाहनांचे नियोजन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून या कामी सुमारे 2 हजार वाहने लागणार आहेत, याचे नियोजन करण्याचे काम सुरू असून सर्वच पातळीवर वाहने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आरटीओ कार्यालयाकडे आहे. त्यामुळे वाहनांचे नियोजन करणे सुरू आहे. - संजय मेत्रेवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी