Wed, Jul 08, 2020 11:05होमपेज › Aurangabad › मुंबईतील स्फोटकांचे औरंगाबाद कनेक्शन

मुंबईतील स्फोटकांचे औरंगाबाद कनेक्शन

Published On: Aug 12 2018 8:07AM | Last Updated: Aug 12 2018 8:07AMदौलताबाद : बी. के. पठाण

मुंबईतील नालासोपारा परिसरात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याच्या घरावर एटीएसने गुरुवारी छापा मारत जिवंत बॉम्बसह स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणाचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत येऊन पोहोचले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (26) हा औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या केसापुरीचा रहिवासी आहे. नोकरीनिमित्त चार वर्षांपूर्वी तो कोल्हापूरला गेला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांसह येथील ‘एटीएस’ही सतर्क झाले आहे. शरदचे येथील मित्र, त्याच्या येथील हालचालींची माहिती गोळा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

सनातन संस्थेचा कार्यकर्ता असलेला वैभव राऊत (रा. नालासोपारा, मुंबई) हा आपल्या साथीदारांच्या मदतीने राज्यात मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी बॉम्ब बनविण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मिळाली होती. त्या माहितीअधारे खात्री केल्यानंतर गुरुवारी रात्री एटीएसने वैभवच्या घरावर छापा मारला. तेव्हा त्याच्या घरात तब्बल 20 जिवंत देशी बॉम्ब आणि आणखी कित्येक बॉम्ब बनविता येतील इतका मोठा गनपावडर, डिटोनेटरचा साठा सापडला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या   साठ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, वैभवनंतर एटीएसने त्याचे साथीदार शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या अन्य दोन आरोपींना अटक केली. शरदच्या नालासोपारा येथील घरातही बरेच अक्षेपार्ह साहित्य सापडले. हे तिघे आणखी काही साथीदारांच्या मदतीने राज्यात मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत होते, असे तपासात समोर आले आहे. 

एटीएसकडून तपास सुरू

शरद औरंगाबादचा रहिवासी असल्याचे समजताच औरंगाबाद पोलिस आणि एटीएसचे पथक सतर्क झाले आहे. त्याचे मित्र कोण आहेत, तो येथे कुणाशी संपर्कात होता, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नोकरीच्या बहाण्याने गेला होता कोल्हापूरला
आरोपी शरद कळसकर हा मूळ औरंगाबादेतील दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या केसापुरी गावातील रहिवासी आहे. त्याचे कुटुंब एका आध्यात्मिक परिवाराचे भक्‍त आहे. त्याच्या वडिलांना केसापुरी येथे पाच एकर शेती आहे. सर्व कुटुंब सध्या शेतीत राबते. त्याला आई, वडील, लहान भाऊ व एक विवाहित बहीण आहे. शरदने प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण त्याने औरंगाबाद शहरातील विवेकानंद महाविद्यालयात केले. औरंगाबादेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक दिवस वडिलांना शेतीच्या कामात मदत केली; परंतु त्याचे शेतीत मन काही रमेना म्हणून चार वर्षांपूर्वी कॉलेजमधील मित्राच्या ओळखीने तो कोल्हापूरला नोकरीसाठी गेला. तेथे एका खासगी कंपनीत त्याला नोकरी मिळाली. दर तीन-चार महिन्यांनी तो केसापुरीला येत असे. शिवाय दोन-तीन दिवसांआड घरी फोनही करीत असे. दोन महिन्यांपूर्वीच तो नातेवाईकाच्या लग्नानिमित्त घरी येऊन गेला होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.