होमपेज › Aurangabad › चिंताजनक! औरंगाबादेत दिवसभरात ५० पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

चिंताजनक! औरंगाबादेत दिवसभरात ५० पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

Last Updated: May 10 2020 7:28PM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

औरंगाबाद शहरात रविवारी दिवसभरात ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण आकडा ५५८ वर गेला आहे. तर घाटीत उपचार सुरू असलेल्या रोशनगेट येथील ५० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या १३ वर गेली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी याबाबत सांगितले की, शनिवारी दिवसभरात औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ५०८ वर आला होता. तर दिलासादायक म्हणजे मिनी घाटी आणि मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून ३५ जणांनी कोरोनावर मात केली होती. मात्र, रविवारी (दि.१०) सकाळपासून व्हीआरडीएल लॅबमधून येणाऱ्या अहवालातात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. पहिल्या टप्प्यात ३७, दुसऱ्या टप्प्यात १२ असे दिवसभरात ५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यातील बहुतांश रुग्ण हे आधीच्या हॉटस्पॉटमधील असल्याचे दिसून आले. रविवारी आढळून आलेल्यांत राम नगरातील १९, सिल्कमिल कॉलनीतील ८, रोहिदास नगर २, वसुंधरा कॉलनी एन- ७, सिडको १, चंपा चौक ५, दत्त नगर १, संजय नगर १, अभ्युदय कॉलनी समतानगर १, न्यायनगर ५, तर आसिफिया कॉलनीतील १, परिसर माहीत नसलेल्या भागातील १, बेगमपुरा ४, उस्मानपुरा गुरुद्वारा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्हणजे उस्मानुपरा गुरुद्वारा आणि चंपा चौक या नवीन हॉट्स्पॉटची भर पडली आहे. त्यामुळे औरंगाबादेत एकूण ४६ हॉट्स्पॉट बनले आहेत.

घाटीत ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

एकीकडे औरंगाबादेतील वाढती रुग्ण संख्या चिंताजनक बनली आहे. तर दुसरीकडे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढतच आहे. घाटीत उपचार सुरू असलेल्या रोशनगेट येथील ५० वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा रविवारी सकाळी ७.५० वाजता मृत्यू झाला. औरंगाबादेतील कोरोनाचा हा तेरावा बळी आहे.

घाटीचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले की, रोशनगेट येथील ५० वर्षीय रुग्ण २ मे रोजी चिकलठाणा येथील मिनी घाटीत दाखल झाला. त्याला श्वसनाचा त्रास असल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. त्याचा स्वॅब त्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला मिनी घाटीतून घाटीत संदर्भीत करण्यात आले. त्याला मधुमेह, न्यूमोनिया आणि किडनीचा देखील आजार होता. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचे चार वेळा डायलेसिस करावे लागले. ६ मे पासून रुग्णाची प्रकृती अतिगंभीर होत गेली. व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. त्यात दोन दिवसांपासून रक्तदाब देखील कमी होत गेला. रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.