Thu, Jul 09, 2020 22:15होमपेज › Aurangabad › ४०० गुन्ह्यांचा तपास रखडला

४०० गुन्ह्यांचा तपास रखडला

Published On: Nov 21 2018 1:08AM | Last Updated: Nov 21 2018 1:06AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सरकाने डिसेंबर अखेरपर्यंत एक वर्षावरील प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्याचे आदेश दिलेले असताना शहर पोलिसांच्या प्रलंबित गुन्ह्यांचा आकडा तब्बल चारशेंच्या घरात गेला आहे. त्यामुळे गुन्हे आढावा बैठकीत पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हा विषय गांभीर्याने घेत प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याचे आदेश दिले. धक्कादायक म्हणजे, काही प्रलंबित गुन्ह्यांचे कागदपत्रेच गायब असून तपास अधिकारी ते सादर करीत नसल्याचे समोर आल्याने पोलिस आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला. 

पोलिस आयुक्तालयात मंगळवारी मासिक गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्तांनी चांगली कामगिरी करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच, निकृष्ट कामगिरी करणार्‍या ठाणेदारांचे सर्वांसमक्ष कानदेखील टोचले. प्रलंबित गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाया, नियमित गुन्ह्यांचा तपास, मुद्देमाल जप्ती करून फिर्यादींना वाटप करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.कुठलाही गुन्हा नोंद झाल्यावर तो 60 ते 90 दिवसांत निकाली काढावा लागतो. 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्यास न्यायालयाची परवानगी घेऊन तपास करता येतो. पण, तसे काहीही न करता जे गुन्हे प्रलंबित आहेत. त्याबाबत आयुक्तांनी ठाणेदारांना चांगलेच फैलावर घेतले. 2014 पासून आजपर्यंत जवळपास 350 ते 400 गुन्हे प्रलंबित असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

‘त्या’ कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा

प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याचे तर दूरच, पण काही तपास अधिकार्‍यांनी गुन्ह्यांची कागदपत्रेही गायब केली आहेत. त्यांना अनेकदा विनंती करून, पत्र पाठवूनही ते कागदपत्र ठाण्यात जमा करीत नसल्याचे काही ठाणेदारांनी मंगळवारच्या बैठकीत सांगितले. त्यावर आयुक्तांनी गांभीर कारवाई करण्याचा इशारा देत एक ते दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा काही कर्मचार्‍यांवर थेट गुन्हे दाखल होऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.

तीन ठाणेदारांची कानउघाडणी

प्रलंबित गुन्ह्यांचा वाढता आकडा लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी क्रांती चौक, सिटी चौक, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी या ठाणेदारांना चांगलेच सुनावले. यानंतर कामगिरीत सुधारणा न झाल्यास उचलबांगडीचाही इशारा दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सोबतच चांगली कामगिरी करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना शाबासकीही देण्यात आली.