Fri, Jul 10, 2020 02:35होमपेज › Aurangabad › भारतात सापडल्या 372 नवीन प्राण्यांच्या प्रजाती

भारतात सापडल्या 372 नवीन प्राण्यांच्या प्रजाती

Last Updated: Oct 28 2019 1:11AM
औरंगाबाद : जितेंद्र विसपुते

देशात मागील वर्षात तब्बल 372 नवीन प्राण्यांचा शोध लागला आहे, ज्या प्राणिशास्त्रासाठी नवीन आहेत. यात महाराष्ट्रातील तब्बल 38 प्रजातींचा समावेश आहे. भारतीय प्राणी सर्वेक्षणकडून (झूलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया/झेडएसआय) ‘अ‍ॅनिमल डिस्कव्हरीज 2018’ हा 143 पानी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यातून ही सकारात्मकता समोर आली आहे.

झेडएसआयकडून दरवर्षी देशात आढळून आलेल्या नवीन प्राण्यांच्या नोंदीचे, शोधांचे संकलन केले जाते आणि त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मत्रालयांतर्गत असलेली ही शासकीय संस्था असून महाराष्ट्रातील या संस्थेचे कार्यालय पुणे येथे आहे.  झेडएसआयने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मागील वर्षी सबंध विज्ञान विश्वासाठी नवीन असलेले तब्बल 372 प्राणी देशात सापडले. या प्रजातींमध्ये समुद्रजीव, जंतवर्गीय, गांडूळ सदृश, कोळीवर्गीय, खेकडे, कीटक, लवचीक अस्थिजन्य, मासे, उभयचर, सरीसृप, एकपेशीय, पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय या वर्गातील प्राण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात 44 प्रजाती महाराष्ट्रातून शोधण्यात आलेल्या असून यामुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

महाराष्ट्रातून नोंद झालेल्या नवीन प्राण्यांच्या प्रजाती कोल्हापूर, मुंबई, सातारा, सिंधदुर्ग, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यांतून नोंदविण्यात आलेल्या आहेत. 372 पैकी 311  इनव्हर्टीब्रेटस् (पाठीचा कणा नसलेले प्राणी) आणि 61 प्राणी व्हर्टीब्रेटस् (कणा असलेले) आहेत. व्हर्टीब्रेटस्पैकी 30 प्रजाती या सरपटणार्‍या प्राण्यांच्या, 21 प्रजाती माशांच्या आहेत. 9 प्रजाती उभयचर, 1 प्रजाती स्तनपायीची उपप्रजाती आहे. वेस्टर्न घाटमध्ये 59 प्रजाती आढळून आलेल्या आहेत. 

एकूण प्रजातींपैकी 103 प्रजाती झेडएसआयच्या शास्त्रज्ञांनी शोधल्या आहेत. तर उर्वरित प्रजाती विविध संस्था आणि संशोधकांकडून नोंदवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रात आढळून आलेल्या 38 प्रजातींत कीटक, पाली, मासे, खेकडे आणि माशांच्या प्रजातींचा समावेश आहे. 

अहवालानुसार 139 प्राण्यांच्या प्रजाती अशा आहेत, ज्यांची विज्ञान विश्वात नोंद आहे मात्र भारतात त्या पहिल्यांदाच आढळून आलेल्या आहेत. यात स्पंजेस (4), लवचीक अस्थिजन्य (5), जंतवर्गीय (11), सूक्ष्मजीव (1), खेकडे (22), कीटक (47), समुद्रीजीव (11), अपृष्टवंशीय (4), एकपेशी (1), उभयचर (1), पिसेस (11), पक्षी (11), सस्तन प्राणी (1) या प्रजातींचा समावेश आहे.