होमपेज › Aurangabad › दीड मिनिटात पळविली तीन लाखांची बॅग

दीड मिनिटात पळविली तीन लाखांची बॅग

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 12:52AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

पाळत ठेवून हेल्मेटधारी चोरट्यांनी जुन्या मोंढ्यातील श्री रबर एंटरप्रायजेस या टायरच्या दुकानातून अवघ्या दीड मिनिटात तब्बल तीन लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. दुकानात कोणी नसताना चोरट्यांनी डाव साधला. सोमवारी (दि. 25) दुपारी 3 वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले की, फिर्यादी अंगद बाबाराव जाधव (53, रा. एन-9, हडको) यांचे जुना मोंढा भागातील पूनमराज आर्केडमध्ये श्री रबर एंटरप्रायजेस नावाचे टायरचे दुकान आहे. ते टायर रिट्रेडिंग, 

रिमोल्डिंग सप्लायर म्हणून व्यवसाय करतात. जाधव हे सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मित्रासोबत जेवण करण्यासाठी दुकानातच आतील बाजूस गेले. यावेळी दुकानात समोर कोणीच नव्हते. ही संधी साधून एक हेल्मेटधारी चोरटा दुकानात घुसला. त्याने सरळ टेबलाच्या खालच्या बाजूला असलेली तीन लाख रुपयांची बॅग उचलून अवघ्या दीड मिनिटात पोबारा केला. सव्वाचार वाजता अंगद जाधव आले. त्यानंतर त्यांना बॅग आढळून आली नाही. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले. त्यात बॅग लंपास झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी 26 डिसेंबर रोजी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

सीसीटीव्हीत घटना कैद

हेल्मेटधारी चोरटा दुकानात घुसला. त्याने इकडे तिकडे न पाहता थेट टेबलजवळ ठेवलेली तीन लाख रुपयांची बॅग उचलली आणि पोबारा केला. त्यामुळे या बॅगमध्ये पैसे आहेत, हे चोरट्याला आधीपासूनच माहिती होते, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. यातून चोरट्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.