Wed, Aug 12, 2020 09:13होमपेज › Aurangabad › लासूरमध्ये २४ लाखांचा गुटखा जप्त

लासूरमध्ये २४ लाखांचा गुटखा जप्त

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 02 2018 12:57AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लासूर स्टेशन येथील ‘गुटखा किंग’ कल्पेश सोनी याला ग्रामीण पोलिसांनी जोरदार झटका दिला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिरेगाव आणि लासूर स्टेशन येथे तीन ठिकाणी छापे मारून तब्बल 24 लाख 31 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. गुरुवारी (दि. 1) पहाटे 5 वाजता 23 जणांच्या पथकाने ही ‘जंबो’ कारवाई केली. यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

दादासाहेब लक्ष्मण कर्‍हाळे (रा. शिरेगाव), दिनेश कैलास गोटे (रा. शिरेगाव) आणि सलीम जाहेद बेग (रा. लासूर स्टेशन) यांच्या घरांमध्ये छापे मारून 229 गोण्या गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा अन्न व औषधी प्रशासनाच्या ताब्यात दिला असून सर्व गुटखा कल्पेश सोनी याचा असल्याचे संशयितांनी सांगितले, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी दिली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लासूर स्टेशन व शिरेगाव येथे मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असून हा गुटखा अवैध विक्रीसाठी वापरला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना मिळाली होती. त्यावरून सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. 

पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक बी. जी. दुलत, व्ही. जी. जाधव, सहायक फौजदार गफार पठाण, गणेश जाधव, वसंतराव लटपटे, हवालदार विठ्ठल राख, रतन वारे, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, रंगराव बावस्कर, संजय काळे, पोलिस नाईक रमेश अपसनवाड, संजय भोसले, आशिष जमधडे, राहुल पगारे, कॉन्स्टेबल सागर पाटील, रामेश्‍वर धापसे, ज्ञानेश्‍वर मेटे, महिला कॉन्स्टेबल योगिता थोरात, सुरेखा वाघ, पुष्पांजली इंगळे, रजनी सोनवणे यांचे पथक तयार केले. मोजक्या कर्मचार्‍यांनी बुधवारी रात्री संबंधित ठिकाणांची पाहणी केली. गुरुवारी पहाटे साडेचार वाजताच पथक शिरेगावात धडकले.