Sat, Dec 07, 2019 20:20होमपेज › Aurangabad › मराठवाड्यातील प्रकल्पांत २२ टक्के पाणी

मराठवाड्यातील प्रकल्पांत २२ टक्के पाणी

Published On: Oct 19 2018 1:45AM | Last Updated: Oct 19 2018 12:07AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

यंदा मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या 35 टक्के पावसाची तूट आहे, पडलेला पाऊसही कमी-अधिक प्रमाणात असल्याने, मराठवाड्यातील लहान-मोठ्या धरणांत पाणी जमा झालेले नाही. ऑक्टोबर अर्धा संपला असून, लहान-मोठ्या धरणांत केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, हे पाणी पुढील साडेआठ महिने पुरवावे लागणार आहे.

जून ते 15 ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात सरासरी साडेसातशे मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता, त्या तुलनेत सरासरी 500 मिलिमीटर पाऊस पडला आहे. साडेचार महिन्यांच्या या कालावधीत पावसाचे दोन मोठे खंड मराठवाड्याने सोसले आहेत. खरीप हंगामातून खाण्याएवढे धान्य निघेल की नाही, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे जुलै महिन्यापासूनच मराठवाड्यात टंचाईने बस्तान बसवलेले आहे. त्यात धरणेही अर्धीअधिक रिकामी आहेत.  मध्यम प्रकल्पांत नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांतील धरणांत 35-40 टक्के साठा आहे, तर औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील धरणांत 10-15 टक्के इतके अत्यल्प पाणी आहे.  जायकवाडी धरणात 38 टक्के, सिद्धेश्‍वरमध्ये 22, निम्न मनार 40, विष्णुपुरी 87, निम्न दुधना 22, येलदरी 9 टक्के पाणीसाठा आहे, माजलगाव, मांजरा आणि सीना कोळेगाव ही धरणे कोरडीठाक पडलेली आहेत.