Fri, Jul 10, 2020 01:55होमपेज › Aurangabad › जिल्ह्यात ५ हजारांवर बेरोजगारांना २१ कोटी

जिल्ह्यात ५ हजारांवर बेरोजगारांना २१ कोटी

Published On: Mar 14 2019 2:03AM | Last Updated: Mar 14 2019 1:44AM
औरंगाबाद, प्रतिनिधी : सुरुवातीला अर्ज मंजुरीला होत असलेला विलंब कमी झाला असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे जिल्ह्यात आतापर्यंत 21 कोटींपेक्षा जास्त कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती महामंडळच्या वतीने देण्यात आली.

मराठा समाजातील युवकांना आपला उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना सरकारने केली आहे. महामंडळ स्थापन झाल्यानंतर बँकेकडून लाभार्थ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. समाजातील तरुणांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवत ही योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी अशी सूचना राज्य सरकारने केली. त्यानंतर बँकेने अर्ज मंजूर करण्यास गती दिली आहे.  यावर्षीच्या सुरुवातीला जास्त लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर व्हावे यासाठी राज्य सरकारने 
फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत 6 हजार अर्ज मंजूर करण्याचे लक्ष्य जिल्ह्यांला दिले आहे. या माध्यमातून 11 मार्चपर्यंत 5,198 अर्जांना मंडळाने पात्रता प्रमाणपत्र दिले आहेत. यापैकी 700 अर्ज बँकांपर्यंत पोहचले असून, यातील 334 अर्जदारांना 21 कोटी 26 लाख 95 हजार 784 रुपयांचे कर्ज बँकेने वाटप केले आहे. तसेच प्रलंबित प्रकरणे लवकरच मंजूर करण्याच्या सूचना बँकेला देण्यात आल्याची महिती महामंडळाच्या जिल्हा शाखेने दिली.  

२४ लाखांचा व्याज परतावा वाटप 

कर्ज मिळालेल्या लाभार्थ्यांनी बँकेला कर्जफेडीच्या स्वरूपात भरलेल्या रकमेतील व्याज महामंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना वापस देण्यात येते. यात कर्ज 
फेडणार्‍या 201 लाभार्थ्यांनी व्याज परतावा वापस मिळावा यासाठी अर्ज केले आहेत. यातील 160 अर्जदारांना महामंडळाच्या वतीने 24 लाख 81 हजार 322 रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.