Fri, Jul 10, 2020 00:32होमपेज › Aurangabad › ‘ज्या’ रेल्वेने जाणार होते, त्याच रेल्वेने त्यांचे मृतदेह रवाना

‘ज्या’ रेल्वेने जाणार होते, त्याच रेल्वेने त्यांचे मृतदेह रवाना

Last Updated: May 09 2020 1:34PM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

जी रेल्वे पकडण्यासाठी मध्य प्रदेशातील मजुरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, रात्रभर रेल्वे रुळावरून खडतर प्रवास केला,  ती रेल्वे अखेर त्यांना मिळाली; परंतु जिवंतपणी नाही, तर मृत्यूनंतर..! औरंगाबाद रेल्वेस्टेशनहून सायंकाळी सात वाजता जबलपूरला जाणार्‍या याच विशेष रेल्वेने या 16 मजुरांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.

अधिक वाचा : देशात तीन रुग्णांमागे एक कोरोनामुक्त 

जालना येथे स्टील कंपनीत काम करणारे हे मजूर लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून अडकून पडले होते. अखेर शासनाने अशा अडकलेल्या लोकांना मूळ गावी जाण्याची मुभा दिली. हा आदेश जारी होताच गेल्या चार दिवसांपासून अडकलेल्या मजूर, कामगार, नोकरदार परप्रांतीय नागरिकांनी गावी जाण्याचा पास मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेकांना पासही मिळाले. जालन्यात अडकलेल्या या मजुरांनीही आपल्या मूळ गावी पाससाठी अर्ज केले होते; परंतु त्यांना तिकडून काहीच उत्तर मिळाले नाही, असे त्यांच्या बचावलेल्या एका सहकार्‍याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 

दरम्यान, मध्य प्रदेशात जाण्यासाठी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून गुरुवारपासून विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे, याची माहिती या मजुरांना समजली. तेव्हा गुरुवारी या 20 जणांनी कसेही औरंगाबाद गाठायचे आणि तेथून शुक्रवारी सायंकाळी सात वाजता जबलपूरला सोडण्यात येणारी विशेष रेल्वे पकडून गावी परतायचे, असा निश्चय केला. त्यानुसार गुरुवारी दुपारपासूनच या 20 जणांनी आपल्या सामानाची आवराआवर केली. सोबत शिळी होती ती शिदोरी उराशी बांधली आणि मग गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास औरंगाबादच्या दिशेने मार्गक्रमण  सुरू केले. 

अधिक वाचा : डोळ्यांदेखत मृत्यू अंगावरून गेला

आपण मेन रोडने औरंगाबादकडे गेलो तर रस्त्यावर पोलिस पकडतील, आपल्याला जाऊ देणार नाही, कारण आपल्याकडे पास नाही, त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी आपण रेल्वे पटरीवरून औरंगाबादकडे जाऊ, असा सर्वांनी एकमताने निर्णय घेतला आणि पायी रुळामधील दगडधोंडे तुडवित अंधारात मार्गक्रमण करीत हे मजूर निघाले. 

पहाटे तीन वाजेपर्यंत त्यांनी प्रयत्नांनी पराकाष्ठा करीत जवळपास 40 किलोमीटरचे हे खडतर अंतर कापले. ते प्रचंड थकले होते. आता औरंगाबाद जवळच आले आहे. थोडी विश्रांती घेऊ आणि सकाळी पुन्हा निघू, असा विचार करीत त्यांनी रुळावरच अंग टाकले. रात्रभर चालून थकल्यामुळे काही क्षणांतच त्यांना गाढ झोप लागली अन् ती झोपच त्यांच्यातील 16 जणांसाठी चिरविश्रांती ठरली. धडधड करीत आलेली मालगाडी या मजुरांना चिरडून निघून गेली. त्यामुळे त्यांनी गावाकडे जाण्यासाठी सुरू केलेला हा खडतर प्रवास  जिवंतपणी अर्धवटच राहिला. मात्र,  दुर्दैवाने   मृत्यूनंतर तो पूर्ण केला.

अधिक वाचा : औरंगाबाद : आणखी ९ जणांना कोरोना, रुग्ण संख्या ४७७ वर
 
सायंकाळी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात या सर्व मजुरांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे मृतदेह औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर नेण्यात आले. तेथून सायंकाळी सात वाजता ज्या रेल्वेने जाण्यासाठी या मजुरांनी हा जीवघेणा प्रवास केला होता, त्याच जबलपूरकडे जाणार्‍या विशेष रेल्वेने हे मृतदेह त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.