Wed, Jul 08, 2020 09:27होमपेज › Aurangabad › बोगस डॉक्टरांकडून १२ लाखांचा हप्ता

बोगस डॉक्टरांकडून १२ लाखांचा हप्ता

Published On: Dec 16 2017 2:19AM | Last Updated: Dec 16 2017 2:19AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्ह्यात 250 जास्त बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. विवेक खतगावकर हे त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी अभय देत आहेत. यासाठी बोगस डॉक्टरांकडून ते प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे साडेबारा लाख रुपयांचा हप्‍ता घेत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य विजय चव्हाण यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत केला. मात्र, डॉ. खतगावकरांनी आरोप फेटाळून लावले.

तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील बोगस प्रॅक्टिस डॉक्टरांचा सर्व्हे केला होता. यात 266 अनधिकृत डॉक्टर कार्यरत असल्याचे समोर आले. पैशांसाठी गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणार्‍या डॉक्टरांवर जि.प. आरोग्य विभागामार्फत गुन्हे नोंदवण्याची कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र असे न करता प्रत्येकी पाच हजार रुपयांचा हप्‍ता घेऊन बोगस डॉक्टरांना अभय दिले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी भर सभेत केला.

यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. तसेच लाडसावंगी येथील आरोग्य केंद्रात अधिकार नसतानाही फार्मासिस्टला पदस्थापना दिली असून, यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही आरापे केला. सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍याची बाजू घेत लाच घेतल्याचा पुरावा सादर करण्याची मागणी केली.

‘डीएचओं’नी फेटाळले आरोप

हप्तेखोरीचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत डॉ. खतगावकर यांनी ते फेटाळून लावले. बोगस डॉक्टरांवर येत्या पंधरा दिवसांत कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले. वैयक्‍तिक आरोप करू नये, अशी विनंती प्रभारी सीईओ अशोक सिरसे यांनी केली.