Sat, Jul 11, 2020 11:05होमपेज › Aurangabad › लॉकडाऊनमध्ये काम नव्हतं म्हणून झाला वाहनचोर!

लॉकडाऊनमध्ये काम नव्हतं म्हणून झाला वाहनचोर!

Last Updated: Jul 02 2020 7:55AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचे काम गेले. यात काहींनी दुसरे क्षेत्र निवडले तर काही थेट गावी जाऊन शेती, मजुरी करू लागले. मात्र एका तरुणाने चक्क वाहन चोरी सुरू करून गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकले. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे त्याला चोरलेल्या दुचाकी विक्री करण्यासाठी ग्राहक मिळाले नाहीत. त्यामुळे महिन्यात सहा दुचाकी चोरी केल्यानंतर तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सोमवारी (दि. २९जून) गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

अधिक वाचा : औरंगाबाद  : 'फायर ब्रिगेड'च्या सुरेंची मनसे उपाध्यक्षाला हात-पाय तोडण्याची धमकी

इम्रान अजीज मन्सुरी (२३, रा. ह.मु. जहांगीर कॉलनी, हर्सूल,श्रीरामपूर, अहमदनगर,) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले, लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारी कमी झाली होती. मात्र, त्यानंतर अचानक गुन्हेगारी वाढू लागली आहे. वाहन चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे दुचाकी चोरांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. त्यांना सोमवारी एक दुचाकी चोर ग्राहक शोधण्यासाठी हर्सूल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह सापळा रचला आणि इम्रानला पकडले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केल्यावर त्याने फाजलपुरा येथून सहा दिवसांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने सिग्मा हॉस्पिटल परिसर, जधावमंडी, औरंगपुरा, पाचोरा (जि. जळगाव) येथून आणखी पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. 

अधिक वाचा : औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीत ४ जुलैपासून संचारबंदी

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर, हवालदार श्रीराम राठोड, गोमटे, शेख बाबर, विकास माताडे, नितीन धुळे, नितीन देशमुख यांच्या पथकाने केली. 

गादी घरात करायचा काम

इम्रान हा गादी भरण्याचे काम करायचा. मात्र लॉकडाऊन लागल्यानंतर त्याचे काम बंद पडले. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यावर त्याने २९ मे रोजी पहिली दुचाकी चोरली. हर्सूल येथील हरसिद्धी देवी मंदिराजवळील झुडपांमध्ये त्याने या सर्व गाड्या उभ्या करून ठेवल्या होत्या. तो पाच वर्षांपूर्वी श्रीरामपूर येथून औरंगाबादला आला आहे.

अधिक वाचा : औरंगाबादेत कोरोना संकट कायम, नवे २०२ रुग्ण