Fri, Oct 30, 2020 03:30होमपेज › Arthabhan › अर्थभान

अर्थभान

Last Updated: Mar 22 2020 8:13PM
प्रीतम मांडके

कोरोना व्हायरस प्रसारामुळे जगभरातील बाजारांमध्ये भयावह पडझड सुरूच. गत सप्‍ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 1209.75 आणि 4187.52 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 8745.45 व 29915.96 बंद झाले. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांक अनुक्रमे 12.85 टक्के व 12.28 टक्क्यांनी कोसळले. शुक्रवारच्या सत्राअखेर निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाने 5.83 टक्के व 5.75 टक्क्यांची उसळी दर्शवून सावरण्याचा प्रयत्न केला. गत सप्‍ताहात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)चे भांडवल बाजारमूल्य तब्बल 13 लाख कोटींनी कमी झाले.

कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला नसलेल्या फटक्यातून सावरण्यासाठी ‘वित्तीय कृती समिती’ (इकॉनॉमिक टास्क फोर्स)ची स्थापना केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. लघू उद्योगांनी घेतलेली कर्जे अनुत्पादित कर्जे म्हणून गणली जाऊ नयेत म्हणून मर्यादा 90 दिवसांवरून 6 महिन्यांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता. मासेमारी व कुक्कुटपालन उद्योगासाठी विशेष पॅकेज जाहीर केले जाणार असण्याची शक्यता.

आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे युद्धपातळीवर प्रयत्न. रिझर्व्ह बँक रोखे खरेदी करण्यासाठी 30 हजार कोटींच्या निधीची तरतूद करणार. मागील सहा आठवड्यांमध्ये रिझर्व्ह बँकेकडून तब्बल अडीच लाख कोटींचा निधी भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवण्यात आला. या सगळ्या प्रयत्नांपश्‍चात निर्देशांक रोखे व्याजदर (बेंचमार्क बाँड यील्ड) 15 बेसिस पॉईंटनी घसरून 6.26 टक्क्यांवर खाली आला.

बीएस-4 धर्तीवर निर्मिल्या गेलेल्या वाहनांची नोंदणीची कालमर्यादा 1 एप्रिलऐवजी पुढील तीन महिने पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती ‘हिरो मोटोकॉर्प’ कंपनीतर्फे सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली. बीएस-6 इंजिन असणार्‍या वाहनांची विक्री सुरू झाल्यावर 1 एप्रिलपासून बीएस-4 ची विक्री पूर्णत: बंद होणार आहे. परंतु वाहन कंपन्यांकडे अजूनही दोन आठवडे पुरेल इतका कच्चा माल कारखान्यांमध्ये पडून आहे. कोरोना व्हायरसच्या झटक्यातून वाहन उद्योगाला सावरण्यासाठी काही सवलतींची गरज असल्याचे हिरोमोटोकॉर्पने स्पष्ट केले. 

देशातील औषध उत्पादन युद्धपातळीवर वाढवण्यासाठी औषधे तसेच त्यांचे उपघटक बनवणार्‍या भारतीय औषध कंपन्यांसाठी 3 हजार कोटींचे पॅकेज केंद्र सरकार जाहीर करण्याची शक्यता.सर्वोच्च न्यायालयाचे दूरसंचार कंपन्यांवर ताशेरे. एजीआर कर थकबाकीसंबंधी स्वत:च स्वत:च्या थकबाकीची आकडेमोड (सेल्फ असेसमेंट) करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करू नये. सरकारी आकडेवारीनुसार संपूर्ण थकबाकी जमा केली जावी.

अन्यथा कंपन्यांच्या संचालकांना कारागृहात धाडण्याची तंबी, त्याचप्रमाणे दूरसंचार कंपन्यांकडून थकीत असणारा एजीआर ड्यूज (थकीत कर) भरण्यासाठी 20 वर्षांची कालमर्यादा ठेवण्यात यावी, या सरकारच्या विनंतीवर विचार करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सरकारी आकडेवाडीनुसार भारती एअरटेलने एकूण 43980 कोटी व्होडाफोन आयडीयाने 58254 कोटी व टाटा समूहाने 16798 कोटी सरकार जमा करणे अपेक्षित आहे.

आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘एस अँड पी’ ने भारतीय अर्थव्यवस्था वृद्धीदराचा अंदाज 5.7 टक्क्यांवरून अर्धा टक्‍का कपात करून 5.2 टक्क्यांवर खाली आणला. अंदाज खरा ठरल्यास आर्थिक वर्ष 2020 चा विकासदर मागील 11 वर्षांतील नीचांकी दर असेल.

कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाची मागणी घटली. अमेरिकेचे डब्ल्यूटीआय कू्रड 11.06 टक्के घसरून 22.43 डॉलर प्रतिबॅरल तर ब्रेंट कू्रड 5.2 टक्के घसरून 26.98 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले. 

गत सप्‍ताहात गुरुवारच्या सत्रात रुपया चलनाने आजपर्यंतच्या सर्वात कमजोर अशा 75.30 रुपये प्रतिडॉलरच्या भावाला स्पर्श केला. सप्‍ताहाअखेर रुपया 75.18 प्रतिडॉलरच्या जवळपास स्थिरावला.
 भारताची परकीय गंगाजळी 13 मार्च रोजी संपलेल्या सप्‍ताहात 5.35 अब्ज डॉलर्सने घटून 481.9 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

 "