Wed, May 12, 2021 02:03
कोरोनानंतर आरोग्यविमा घेताना...

Last Updated: May 02 2021 8:35PM

जगदीश काळे

जीवन विमा पॉलिसीत मिळणारी भरपाई भरभक्‍कम असते. जर विमा कंपन्या अशा प्रकारच्या जोखमींच्या अर्जदारांना मान्यता देऊ लागले, तर त्यांचा दावा मंजूर करण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. कोरोनाची बाधा झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतरही अनेकांमध्ये मेडिकल कॉम्प्लिेक्शन्स होऊ शकतात.

कोरोना महासाथीच्या तडाख्यात लाखो नागरिक सापडत आहेत. कोरोनावरील उपचाराचे खर्चदेखील लाखांच्या घरात आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेले आणि विमाधारक नसलेले नागरिक आता आरोग्य विमा आणि जीवन विमा घेण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र कोरोनावर मात केल्याने आरोग्य विमा सहजपणे घेऊ शकतो, असा जर विचार करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण पॉलिसी खरेदी करताना अडचणी येऊ शकतात. यामागचे कारण म्हणजे अनेक विमा कंपन्या कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांना एक ते तीन महिन्यांचा वेटिंग पिरीयड देत आहेत. हा वेटिंग पिरीयड संपल्यावरच आपण आरोग्य विम्यासाठी अर्ज करू शकतो. त्याचवेळी आपल्याला अतिरिक्‍त मेडिकल चाचणीदेखील करावी लागू शकते. 

आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसीच्या प्रकरणात विमा कंपन्या अर्जदाराच्या जोखमीची पडताळणी करण्यासाठी अतिरिक्‍त चाचणी करण्यास सांगत आहेत. कोविडमधून बरा झालेला कोणताही व्यक्‍ती तीन महिन्यांनंतर कोविड निगेटिव्ह असल्याचे निष्पन्‍न होत असेल, तर विमा कंपन्यांची जोखीम कमी समजली जाते. या आधारावर भविष्यात कोणताही दावा करण्यास सुलभता येते. पण गेल्या काही काळात कोरोनातून बरे झालेल्या लोकांना अनेक प्रकारचे आजार उद्भवल्याचे आढळून आले आहे. यात काही धोकादायक आजारही बळावल्याचे दिसून आले आहे. जीवन विमा पॉलिसीत मिळणारी भरपाई भरभक्‍कम असते. जर विमा कंपन्या अशा प्रकारच्या जोखमींच्या अर्जदारांना मान्यता देऊ लागले, तर त्यांचा दावा मंजूर करण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. कोरोनाची बाधा झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतरही अनेकांमध्ये मेडिकल कॉम्प्लिेक्शन्स होऊ शकतात. या कारणामुळेच विमा कंपन्या नव्याने पॉलिसी खरेदी करणार्‍यांना अर्ज करण्यापूर्वी चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना पॉलिसी काढण्यासाठी एक ते तीन महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. अर्थात ही बाब संसर्गाच्या गांभीर्यावर अवलंबून आहे.