Fri, Apr 03, 2020 08:55होमपेज › Arthabhan › अर्थवार्ता

अर्थवार्ता

Last Updated: Mar 02 2020 12:54AM
प्रीतम मांडके

गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स एकूण अनुक्रमे 879.10 अंक आणि 2872.83 अंकांनी गडगडला निफ्टी व सेन्सेक्समध्ये अनुक्रमे 7.28 टक्के व 6.98 टक्क्यांची घसरण होऊन निफ्टी व सेन्सेक्सने 11201.75 आणि 38297.29 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. शुक्रवारच्या सत्रात बाजाराचे मूल्य तब्बल साडेपाच लाख कोटींनी कमी झाले. मागील सप्ताहात एकूण बाजारमूल्य सुमारे बारा लाख कोटींनी घटले. जगभर पसरत चाललेल्या कोराना व्हायरसचा धसका जागतिक बाजारपेठातील भांडवलबाजारांनी घेतल्याचे तज्ज्ञांचे मत. 

चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीतदेखील मंदीची लाट कायम डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये भारताची अर्थव्यवस्था केवळ 4.7 टक्के वाढली. कृषी क्षेत्राची वाढ 3.5 टक्के, तर अर्थसंबंधित क्षेत्र 7.3 टक्के वधारले. वेगाने पसरत चाललेला कोरोना व्हायरस अर्थात कोव्हीड 19 या रोगांमुळे अर्थव्यवस्थेत फटका बसल्याचे मत जाणकारांनी मांडले. आर्थिक वर्ष 2020 मध्ये अर्थव्यवस्था वाढीचा वेग 5 टक्के राहण्यासोबत मंदीबद्दल अधिक चिंता करण्याचे कारण नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. जीडीपीमधील हा वृद्धीदर मागील 7 वर्षांतील न्यूनतम दर आहे.

भारताची वित्तीय तूट ठरवलेल्या लक्ष्याच्या 128.5 टक्क्यांपर्यंत पोहोचली. सरकारतर्फे केला जाणारा खर्च आणि सरकारला मिळणारे उत्पन्न यामध्ये 9 लाख 85 हजार कोटींचा फरक पडला. एकूण वित्तीय तूट जीडीपीच्या 3.8 टक्क्यांपर्यंत थोपवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. 

सुझलॉन कंपनीच्या कर्जाची पुनर्रचना (डेट स्ट्रिक्चरींग) करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली. एकूण 14 हजार कोटींच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. ‘टाटा पॉवर’ या ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील कंपनीचा गुजरात, हरियाणा, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र या पाच राज्यांना निर्वाणीचा इशारा बिलाचे पैसे वाढवून न दिल्यास मुद्रा या ऊर्जा प्रकल्पातील वीजनिर्मिती थांबवली जाणार. 17 हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातील कमी वीजदरामुळे आर्थिक वर्ष 2020 मध्ये 1 हजार कोटींचा तोटा कंपनीला सोसावा लागत असल्याचे जाणकारांचे मत या प्रकल्पाद्वारे सुमारे 4 हजार मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते.

बाजार नियामक संस्था सेबी संस्थेच्या अध्यक्षपदी असणारे अजय त्यागी यांना सहा महिन्यांची मुदतवाढ अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती; परंतु या कालमर्यादेत अध्यक्ष निवड न झाल्याने सरकारने सध्याच्या अध्यक्षांना मुदतवाढ दिली. एकूण 24 जणांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केल्याची माहिती.

घरबांधणी उद्योग समूहातील कंपन्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न निधीअभावी रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी 12500 कोटींचे अर्थसाहाय्य अल्टरनेटीव्ह इन्व्हेस्टमेंंट फंडमार्फत दिले जाणार्‍या या अर्थसाहाय्यांमुळे सुमारे 26 हजार कोटींचे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास जाऊन 50 हजार कुटुंबांना आपली घरे मिळतील, असे प्रतिपदन एसबीआयकॅप व्हेंचर्सचे चेअरमननी केले. सध्या एसबीआय कॅपकडे या इन्व्हेस्टमेंट फंडाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आयआरबी इन्फ्रा 3 हजार कोटींच्या कर्जाची परतफेड मुदतीआधी करणार. सिंगापूरच्या जीआयसी उद्योगसमूहाकडून आयआरबीला 3800 कोटींची गुंतवणूक मिळाली.

व्होडाफोन-आयडिया कंपनीकडून ‘एजीआरड्यूज’संबधी कर भरण्यासाठी 15 वर्षे मुदतीची मागणी करण्यात आली. कंपनीत एकूण 57 हजार कोटी सरकार जमा करणे अपेक्षित आहे, परंतु यापैकी केवळ 3500 कोटी भरण्यास कंपनी समर्थ ठरली.

कंपनी केवळ 23 हजार कोटी सरकारला देणे लागते, असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यापैकी 7 हजार कोटी मुद्दल परतफेड असून बाकी सर्व व्याज असल्याचे व्होडाफोन-आयडियाचे प्रतिपादन.
10341 कोटींचा एसबीआय कार्डस्चा आयपीओ 2 मार्च रोजी खुला होऊन 5 मार्च रोजी बंद होणार. आयपीओचा किमतीपट्टा 750 ते 755 दरम्यान ठरवण्यात आला आहे.
 भारतीय कंपनी हल्दीराम फूड जनरल अ‍ॅटलांटिकला काही हिस्सा विक्री करण्यासाठी उत्सुक. 
 भारताची परकीय गंगाजली 21 फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात विक्रमी पातळीवर म्हणजे 476.12 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.