Tue, Mar 09, 2021 16:13
चार बँकांचे खासगीकरण; खातेदारांचे काय होणार?

Last Updated: Feb 22 2021 12:00PM

डॉ. वसंत पटवर्धन

गेले पंधरा दिवस असलेली तेजी आता हळूहळू मंदावत आहे. मात्र चार बँकांच्या खासगीकरणाच्या बातमीनंतर बँकांचे शेअर्स वधारत आहेत. विशेषतः बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया व इंडियन ओव्हरसीज बँक यावर निवेशकांचे लक्ष जास्त केंद्रित झाले आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्र बँकेचा शेअर 12 रुपयांच्या आसपास मिळत होता. गेल्या आठवड्यात त्याला अनेकदा वरचे सर्किट लागले होते. गुरुवारी 18 तारखेला हा भाव बंद होताना हा भाव 25 रुपयांची सीमा ओलांडून पुढे गेला होता.

अन्य काही शेअर्सचे भाव खालीलप्रमाणे होते. (गुरुवारी 18 ता.चे बंद भाव) हेग 1504 रुपये, ओएनजीसी 111 रुपये, जिंदाल स्टेनलेस 116, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन 99 रुपये, जिंदाल स्टील 377, लार्सेन ट्रब्रो इन्फोटेक 3871,  ग्राफाईट 472, हिंदुस्थान पेट्रोलियम 245, स्टेट बँक ऑफ इंडिया 415, फिलीप्स कार्बन 202, जे कुमार इन्फ्रा 211, बजाज फिनसर्व्ह 10,198, आयटीसी 218, एचडीएफसी 2745, सन फार्मा 616 रुपये, नवीन फ्लुओर 2523, मुथूट फायनान्स 1293, रेप्को होम्स 356, बजाज फायनान्स 5563, मण्णपूरम 176, केइआय इंडस्ट्रीज 502, भारत पेट्रोलियम 432, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स 231, भारती एअरटेल लिमिटेड 589, कोटक बँक 1945.कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अनेकांचे रोजगार गेले व त्यांच्यावर कर्जे घेण्याची वेळ आली आहे. लोकांनी घेतलेली कर्जे (रिटेल) 40 लाख कोटी रुपयांच्यावर गेली आहेत. बुडीत व अनार्जित कर्जाचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये गृहकर्जे मोठ्या प्रमाणावर आहेत. थकीत कर्जात शैक्षणिक कर्जेही आहेत. एकूण कर्जापैकी शैक्षणिक कर्जे 12 टक्क्यांच्या आसपास आहेत. क्रेडिट कार्डांची देणे रक्कम 5.30 टक्केआहेत, वाहन कर्जे 4  टक्के आहेत, ग्राहक कर्जे (कन्झ्युमर क्रेडिट) 2.1 टक्के आहेत. सोने तारण कर्जे 0.7 टक्के आहेत.

रिझर्व्ह बँकेने नुकत्याच सादर केलेल्या ‘फायनान्शिअल स्टॅबिलीटी रिपोर्ट (वित्तीय स्थिरता अहवाल)’ मध्ये बँकांची थकीत कर्जे सप्टेंबर 2021 पर्यंत 14 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण विमा कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या कंपन्यात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे नॅशनल इन्श्युरन्स, ओरिएंटल इन्श्युरन्स आणि युनायटेड इंडिया इन्श्युरन्स या तिन्ही कंपन्यांचे भाग भांडवल वाढवण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार नॅशनल इन्श्युरन्समधील भागभांडल 7500 कोटी रुपये, युनायटेड इंडिया आणि ओरिएंटल यांचे भाग भांडवल प्रत्येकी 5000 कोटी रुपये करण्याचे आले होते.

केंद्र सरकारने नुकतीच 2020-2021 वर्षातील पुरवणी मागण्यांसाठी 6.28 लाख कोटी रुपयांच्या खर्चास संसदेकडे परवानगी मागितली आहे. त्यातच सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या भांडवलीकरणाच्या रकमेचाही समावेश आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र 8 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानंतर या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या जातील.

बँकांचे जरी खासगीकरण झाले तरी खातेदारांची खाती सुरक्षित राहतील. केंद्र सरकार बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या चार मोठ्या सरकारी बँकांमध्ये अधिक समभाग बाळगून नियंत्रण ठेवण्याचा केंद्राचा उद्देश असेल. त्याशिवाय बँकांची थकीत कर्जे कमी करण्यासाठी (वसूल) पुन्हा योजना पुन्हा राबवली जाण्याची शक्यता आहे. आगामी आर्थिक वर्षात केंद्र सरकार सार्वजनिक बँकात 20 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहे.

वर उल्लेख केलेल्या 4 बँकांपैकी 2 बँका खासगीकरणासाठी यंदा निवडल्या जातील. त्यात बँक ऑफ महाराष्ट्र निश्चित असावी. तिची अधिक माहिती ‘चकाकत्या हिर्‍याच्या’ परिच्छेदात दिली आहे. गुंतवणुकीसाठी मदर्सन सुमी हा शेअर विचारात घेण्यासारखा आहे. तिची गेल्या 9 महिन्यांतील कामगिरी सरस आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ती विविध प्रकारच्या वाहनांच्या सुट्या भागांची विक्री करते. यंदा अशा सुट्या भागांची विक्री मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव 213 रुपये आहे. अमेरिकेत तिची विक्री जास्त मोठ्या प्रमाणात होते. पुढील बारा महिन्यांत सध्याच्या भावात 35 ते 40 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. डिसेंबरअखेर संपलेल्या 9 महिन्यांचे आकडे फेब्रुवारी 12  ला प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे गेल्या 7 दिवसात कंपनीच्या शेअरचा भाव 20 टक्क्याने वाढला आहे. त्यामुळे माफक प्रमाणात इथे गुंतवणूक करायला हरकत नाही.

बँक ऑफ महाराष्ट्र

‘चकाकता हिरा’ म्हणून निवडलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रची स्थापना 16 सप्टेंबर 1935 रोजी केसरी मराठा संस्थेच्या कार्यालयामध्ये करण्याचे ठरले. प्रत्यक्ष कारभार 31 जानेवारी 1936 रोजी सुरू झाला. पण रीतसर बँकेच्या स्थापनेची घोषणा 8 फेब्रुवारी 1936 ला करण्यात आली. बँकेचे पहिले अध्यक्ष प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ  वा. गो. काळे हे होते. कंपनीचे पहिले मॅनेजर म्हणून श्री. गोखले यांची नेमणूक करण्यात आली होती. 1943 साली चि. वि. जोग यांनी कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्र बँकेत येण्यापूर्वी श्री. जोग यांनी बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदामध्ये काम केले होते. 1943 ते 1973 पर्यंत त्यांनी बँकेची धुरा सांभाळली. 1973 ते 1977 मध्ये वि. म. भिडे हे बँकेचे अध्यक्ष होते. उत्तर प्रदेशचे कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केल्यानंतर बँकिंग सेक्रेटरी म्हणून ते केंद्र सरकारच्या अर्थखात्यात रुजू झाले. 1977 साली ते निवृत्त झाल्यानंतर माजी अध्यक्ष व कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक झाली. 6 वर्षे पदभार सांभाळल्यानंतर मी जुलै 1983 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. श्री. जोग निवृत्त झाले. त्यावेळी बँकेच्या शाखा 150 होत्या. श्री. भिडे निवृत्त झाले तेव्हा बँकेच्या शाखा 450 होत्या. सहा वर्षांच्या कार्यकालात शाखा विस्तार जोमाने करून मी शाखांची संख्या 912 पर्यंत नेली. 1969 साली तिचे राष्ट्रीयीकरण झाले.

31 डिसेंबर 2020 रोजी तिची कर्जे 1 लक्ष 5 हजार कोटी रुपये होती. ठेवी 1 लक्ष 61 हजार 971 कोटी रुपये होत्या. डिसेंबर 2020 च्या तिमाहीचा तिचा नफा 154 कोटी रुपये होता. मार्च 2020 ला संपलेल्या पूर्ण वर्षासाठी तिचा नफा 389 कोटी रुपये होता. तिचे भागभांडवल 6560 कोटी रुपये आहे. त्यातील काही भाग सरकार विक्रीस काढील. तीन-चार महिन्यांपूर्वी तिचा भाव 12 रुपयांच्या आसपास होता. तो सध्या 26 रुपयांच्या आसपास असून तिचा रोज व्यवहार 7 कोटी शेअर्सच्या वर होत आहे.

माननीय पंतप्रधान कै. मुरारजी देसाई यांनी 3 मे 1978 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ‘लोकमंगल’ या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन केले होते. 1981 साली माननीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्र राज्यातील 500 व्या शाखेचे उद्घाटन केले होते. देशातील एकाच राज्यात 500 शाखा असण्याचा बहुमान तिला मिळाला होता. सहा वर्षांत उघडलेल्या 500 शाखाही विक्रम समजला जातो.