टप्प्याटप्प्याने व थोडीच गुंतवणूक करा

Last Updated: Mar 22 2020 8:09PM
Responsive image


डॉ. वसंत पटवर्धन
गेल्या आठवड्यात सगळीकडे जगभरात कोरोनाने थैमान घातले; ते अजून चालूच आहे. युरोप, भारत, अमेरिकासह जवळजवळ 50, 60 देशांत याची लागण झाली आहे. हे थैमान अजून तीन महिने तरी चालू राहील.

महाराष्ट्र राज्य व अनेक राज्यांनी जमावबंदीचे आदेश जाहीर केले आहेत. शिर्डी, शेगाव, नरसोबाची वाडी, कोल्हापूर, अक्‍कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, सिद्धेश्‍वर या सर्व ठिकाणी याची अंमलबजावणी जारी आहे. मुंबईत राणीचा बाग, सिद्धीविनायक, महालक्ष्मी ही सर्व ठिकाणे तसेच पुण्यात सरसबाग, दगडूशेठ गणपती येथेही मोठ्या प्रमाणावर जमू नये, असे आदेश निघाले आहेत. 100 वर्षांपूर्वी पुण्यात व पुण्याजवळ अहमदनगर व अन्य ठिकाणीही प्लेगच्या साथीने असाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर सुमारे 25 वर्षांनी 1945 च्या सुमारास प्लेगची पुनरावृत्ती झाली होती.

2023 व 2024 साली ज्या कर्जरोख्यांची मुदत संपत आहे; त्यामुळे बाजारातील द्रवता कमी होण्याची शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून रिझर्व्ह बँक कर्जरोखे विकत घेईल व बाजारात चलन द्रव्यता वाढवेल. शेअरबाजारात बँकांच्या शेअर्सच्या किंमतीही झपाट्याने घसरत आहेत. एकूण सर्व बाजारच आकारहीन स्थितीत आहे. गुंतवणूकदारांनी सध्या गुंतवणूक करणे टाळावे. सोने बाजारातही बरीच घसरण झाली असून सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 32000 रुपयांपर्यंत उतरला आहे. रिझर्व्ह बँकेचे पुढील द्वैमासिक वित्त धोरण एप्रिलच्या पहिल्या गुरुवारी जाहीर होईल. त्यावेळी रेपो रेट पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे पर्यटन व प्रवास यावर प्रचंड विपरीत परिणाम झाला आहे. ब्रेंट क्रूडही 18 वर्षांतील नीचतम पातळी दाखवत आहे. एका बॅरलला सुमारे साडेचोवीस डॉलर्सपर्यंत भाव आला आहे. क्रूडचे भाव चीनने सुपरपॉवर होण्यासाठी पावले उचलल्याने वाढायला लागले होेते. पण चीनची अर्थव्यवस्था आता हळूहळू गर्तेत चालली असून कोरोनामुळे चीनला सर्वात मोठा फटका बसत आहे. कोरोनाची सुरुवातही चीनपासूनच झाली आहे. जागतिक नकाशावर जेव्हा अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी बदल होत असतात, तेव्हा जी 8 आणि जी 20 हे राष्ट्रगट लगेच जागरूक होत असतात व सामूहिकरीत्या परिणामकारक उपाययोजना सुरू करतात. यावेळी अजून तसे काहीही झालेले नाही.

आर्थिक क्षेत्रात लवकरच पॅनकार्ड व आधारकार्ड यांचे क्रमांक जोडले जाण्याची मुदत 31 मार्चअखेर आहे. ज्यांनी ही पावले उचलली नसतील; त्या प्राप्‍तिकरदात्यांनी वेळ पडल्यास चार्टर्ड अकौंटची मदत घेऊन हे सहश्रीकरण करून घ्यावे, अन्यथा त्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल. पर्मनंट अकौंट नंबर (झरप) याला आता खूप महत्त्व आले आहे.

अर्थक्षेत्रातील प्रतिकूल बातम्यांचा निर्देशांक व निफ्टीवर परिणाम होत आहे. त्यामुळे निर्देशांक 28,869 वर बंद झाला, तर निफ्टी 8468 वर बंद झाला. हे आकडे 18 मार्च 2020 चे आहेत.
क्रूडचे भाव घसरल्यामुळे भारतात आयात होणार्‍या पेट्रोलचे व डिझेलचे भाव कमी व्हायला हवेत; पण तसे झाले नाही, तर पेट्रोलमधील आयातीसाठी लागणारी किंमत कमी झाल्यामुळे भारताची वित्तीय तूट कमी होईल. त्याचा फायदा पुढील वर्षी फेब्रुवारीत मांडल्या जाणार्‍या अर्थसंकल्पात दिसेल.

कोरोनामुळे अनेक कंपन्यांची विक्री कमी होणार आहे. त्याचा परिणाम बजाज फायनान्स, मुथूट फायनान्स, महिंद्र अँड महिंद्र फायनान्स अशासारख्या कंपन्यांवर होईल. बजाज फायनान्स शुक्रवारी 20 मार्चला 2962 रुपये होता. त्याचा गेल्या वर्षभरातील उच्चांकी भाव 4523 रुपये होता, तर नीचांकी भाव  2485 रुपये होता. पुढील काही दिवस बाजारातील घसरण अशीच चालू राहिली आणि बजाज फायनान्स 2600 रुपयांपर्यंत आला, तर तो जरूर घ्यावा. गेल्या शुक्रवारी बजाज फायनान्स 2750 वर उघडला होता. दिवसात तो 3043 पर्यंत वर चढला. सुमारे पावणे तीन लाख शेअर्सची विक्री झाली होती. सध्याच्या किमतीला किं/ऊ. गुणोत्तर 31.67 पट दिसते.

स्टेट बँक ऑफ इंडिया 209 रुपयांपर्यंत घसरला आहे. येस बँकेची घसरण चालूच आहे. गेल्या शुक्रवारी तो 45.85 रुपये होता. पॉवर फायनान्स कार्पोरेशन 90 रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. गुजराथ हेवी केमिकल्स 90 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. सध्याची घसरण बघता गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्याने व थोडी थोडीच गुंतवणूक करावी. रुपया सध्या डॉलरच्या तुलनेत 75 रुपयांपर्यंत घसरला आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठ्या प्रमाणावर डॉलरची विक्री केली तरीही रुपयाची घसरण थांबलेली नाही.