Fri, Apr 23, 2021 14:42
क्लेम कधी नाकारतात?

Last Updated: Apr 05 2021 2:17AM

जान्हवी शिरोडकर

कुटुंबाला आर्थिक सुरक्षा रहावी यासाठी बहुतांश मंडळी टर्म प्लॅनची निवड करतात. या टर्म पॉलिसीमुळे पॉलिसीधारकाच्या आकस्मिक  मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. दाव्यानुसार पैसे मिळाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान होते. विमाधारकांचा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मृत्यू होऊ शकतो. अपघात, आजारपण, दुर्घटना आदी. मात्र सर्वच मृत्यू प्रकरणाला विमा कवच असतेच असे नाही. काही प्रकरणात दावा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे टर्म इन्श्युरन्समध्ये कोणत्या प्रकारच्या मृत्यू प्रकरणांना समाविष्ट केले जात नाही, हे जाणून घेऊया.

आत्महत्येने मृत्यू : एखाद्या व्यक्तीने पॉलिसी घेतल्यानंतर 12 महिन्यांच्या आत आत्महत्या केल्यास लाभार्थ्याला भरपाईची 80 टक्के रक्कम मिळते. (पॉलिसी नॉन लिंक्ड असल्यास) लिंक्विड प्लॅनच्या स्थितीत पॉलिसीधारकाची पॉलिसी असेल आणि 12 महिन्यांच्या आत आत्महत्येने मृत्यू होत असेल, तर लाभार्थ्याच्या वारशाला भरपाईच्या शंभर टक्के रक्कम मिळू शकते. अर्थात पॉलिसीधारकाने एक वर्षानंतर आत्महत्या केल्यास त्याला बेनिफीट मिळणार नाही आणि पॉलिसी संपुष्टात येईल. काही जीवन विमा कंपन्या आत्महत्येच्या प्रकरणाला विमा कवच देत नाहीत. त्यामुळे पॉलिसी घेताना त्याच्या नियमांची पडताळणी करणे गरजेचे आहे. 

धोकादायक प्रयत्नात मृत्यू : पॉलिसीधारकाला ‘खतरो से खेलने’ का शौक असेल आणि दुर्दैवाने त्यात मृत्यू झाल्यास विमा कंपनी टर्म प्लॅन नाकारू शकते. आयुष्याला जोखमीत टाकणार्‍या कोणत्याही गोष्टी यात येऊ शकतात. यात अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस्, मोटार रेस, स्काय डायव्हिंग, पॅरा ग्लायडिंग, बंजी जंपिंग, मौत का कुआँ आदी.

एचआयव्ही : विमा कंपनी अशा प्रकरणात विमा कवच देणार नाही. जर एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यू हा सेक्शुअल ट्रान्समिटेडच्या आजारपणामुळे होत असेल म्हणजेच एचआयव्ही/एड्सने होत असेल तर विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही. 
व्यसनामुळे मृत्यू : पॉलिसीधारक हा दारू पिऊन गाडी चालवत असेल किंवा अमली पदार्थ घेतले असेल आणि अपघातात त्याचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी टर्म प्लॅनची रक्कम देण्यास मनाई करू शकते. अमली पदार्थ किंवा मद्य याचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या वारशांना दावा करता येत नाही.

हत्या : जर एखाद्या पॉलिसीधारकाची हत्या झाली आणि त्यात वारसाचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास किंवा त्याच्यावर हत्येचा आरोप असेल, तर विमा कंपनी टर्म प्लॅनचा दावा मंजूर करत नाही. अशा वेळी क्लेम रिक्वेस्ट पेंडिंग ठेवली जाते. जोपर्यंत नॉमिनीला क्लिन चिट मिळत नाही किंवा तो निर्दोष असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत पॉलिसीची रक्कम दिली जात नाही. याशिवाय पॉलिसीधारक एखाद्या गुन्ह्यात अडकला असेल आणि त्याची हत्या झाली असेल, तर विम्याची रक्कम मिळत नाही.